मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झाला की रस्ता, डिव्हायडर अशा गोष्टींना दोष देऊन कंत्राटदारांचे भले करणारी एखादी उपाययोजना सुचवली जाते. पण अतिवेगात सुसाट निघालेल्या बेदरकार वाहनचालकांमुळेच हे अपघात होत असल्याने वेगावर नियंत्रण आणि त्यासाठी कठोर शिक्षा हेच उपाय असल्याची आग्रही भूमिका वाहतूकतज्ज्ञांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना मांडली. तकलादू उपायांमुळे कंत्राटदारांचे भले होईल, पण वेग नियंत्रणात असल्याशिवाय अपघात कसा टळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाश्चात्त्य देशांत माहिती तंत्रज्ञान, कॅमेरे यांचा वापर करून वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर कारवाई होते. आपल्याकडे तंत्रज्ञान, यंत्रणा उपलब्ध आहेत, पण कठोर उपाययोजनांची इच्छाशक्ती दिसत नाही, असे चित्र आहे. अशांना चाप लावण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून आठवडय़ाचे सातही दिवस आणि २४ तास महामार्गावरील प्रत्येक वाहनाच्या वेगमर्यादेवर लक्ष देणारी यंत्रणा बसवणे आणि उल्लंघन करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणे हाच अपघात नियंत्रणाचा मार्ग दिसतो.