News Flash

रॉकेलच्या दिव्याखाली बोर्डाचा अभ्यास!

दामू नगरमध्ये राहणारी अफसाना शेख या मुलीची येत्या मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे.

दहावीच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना विद्यार्थ्यांनी जोमाने अभ्यास सुरू केला आहे, मात्र अभ्यासासाठी इच्छा आणि तयारी असतानादेखील रॉकेलच्या दिव्याखाली अगदीच दुसऱ्या वस्तीत राहणाऱ्या मित्रांच्या घरी अभ्यास करण्याची वेळ दामू नगर भागातील विद्यार्थ्यांवर आली आहे. तीन महिन्यांपूर्वी अग्नितांडवात सुमारे अडीच हजार झोपडय़ा बेचिराख झाल्या. यामध्ये हजारो कुटुंबांची वातहत झाली मात्र शासकीय आश्वासनानंतर आज तीन महिने झाले तरी तेथे वीज, पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. या झोपडपट्टीतील दहावी-बारावीच्या मुलांना रस्त्याच्या दिव्याखाली किंवा नातेवाईकांकडे जाऊन अभ्यास करावा लागत आहे. तर कित्येक कुटुंबे दुसरीकडे भाडय़ाने घर घेऊन राहत आहेत. आगीमध्ये आमची सर्व वह्य़ा-पुस्तकांची राख झाली, कित्येक संस्थांनी आम्हाला गणवेशापासून दप्तरांपर्यंत सर्व शैक्षणिक साहित्य पूरविले मात्र वीज नसल्याने आम्ही अभ्यास करू शकत नसल्याचे दामू नगरच्या मुलांचे दु:ख आहे.
दामू नगरमध्ये राहणारी अफसाना शेख या मुलीची येत्या मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. मात्र घरामध्ये वीज नाही, घरातील कामासाठी पाणी लांब जाऊन आणावे लागते. घरात स्वच्छतागृह नसल्याने वस्तीच्या बाहेरच पत्रे लावून आंघोळीसाठी जागा तयार केली आहे. त्यासाठीदेखील अंधार होण्याची वाट पाहावी लागते. गेले तीन महिने हीच अवस्था असल्याने दिवसा अभ्यास करून रात्रीच्या वेळी दुसऱ्या वस्तीत अभ्यासाला जावे लागत असल्याचे ती सांगते. तिच्यासोबत येथील कित्येक मुलेही शाळेत व महाविद्यालयात शिकत आहेत, मात्र साडय़ांचा आणि प्लास्टिकच्या भिंतींचा तात्पुरता निवारा करून आम्ही दिवस ढकलत असल्याचे ती सांगते. याशिवाय सचिन चुवाळे या मुलाची बारावीच्या परीक्षा सुरू असून दिवसा परीक्षेला गेल्यावर रात्री दुसऱ्या वस्तीतील मित्रांच्या घरी किंवा घरात रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करीत असल्याचे तो सांगतो.

या वस्तीत राहणारी अनेक कुटुंबे समोरच्या वस्तीतील मीटरमधून चोरीची वीज घेत आहे, मीटरवरील अतिरिक्त भारामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याची भीती स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. शासकीय नेत्याच्या आश्वासनाव्यतिरिक्त त्यांनी आम्हाला कुठलीच मदत केली नसून तातडीने आम्हाला घरे मिळवून देण्याची मागणी दामूनगरीत स्थानिकांनी केली आहे. मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत करीत असतो. आम्ही शिकलो नाही मात्र आमच्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवावी ही इच्छा आहे. बोर्डाची परीक्षा तुमचे आयुष्य घडवत असते मात्र आमची मुले रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करतात, दुसऱ्या ठिकाणी भाडय़ाने घर घेऊन राहण्याची ऐपत नसल्याने आमची मुले येथेच जमेल तसा अभ्यास करीत असल्याचे मुलांच्या पालकांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 12:03 am

Web Title: hsc and ssc students from damu nagar slum studying on streets
Next Stories
1 दहावी-बारावीचे ‘लेट लतीफ’ मुंबईत सर्वाधिक
2 मी सुटलोय यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही- संजय दत्त
3 मुंबईकरांसाठी चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल उन्नत मार्गांची घोषणा
Just Now!
X