मुंबई : ‘सीबीएसई’सह इतर केंद्रीय मंडळांनी बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतर अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाची (राज्य मंडळ) बारावीची परीक्षा रद्द करण्याची अधिकृत घोषणा गुरुवारी करण्यात आली. राज्य मंडळाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.

बारावीच्या विद्यार्थ्यांचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग कटिबद्ध आहे, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. परीक्षा, मूल्यमापन याच्याशी संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पात्र विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले. बारावीची परीक्षा रद्द करावी, अशी भूमिका राज्याने केंद्राच्या बैठकीतही मांडली होती. त्याबाबत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. परीक्षा रद्द करण्याच्या प्रस्तावाला आपत्ती व्यवस्थापन विभागाने मान्यता दिल्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात आली.

परीक्षा का रद्द?

विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता राखण्यासाठी व राज्यातील विविध परीक्षा मंडळांच्या मूल्यमापनामध्ये एकसूत्रता असावी यासाठी राज्य सरकारनेही राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. याबाबत शालेय शिक्षण विभागाने परीक्षेबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षण विभागातील अधिकारी, तांत्रिक सल्लागार, शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत व्यक्ती इत्यादींशी विविध स्तरावर सखोल चर्चा केली होती. परीक्षा रद्द कराव्यात व अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असे मत तज्ज्ञांनी बैठकीत व्यक्त केले होते.