मुंबई, पुण्यातील ११ विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळही उल्लंघन केल्याने मनाई

उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी बंदी करण्याच्या निर्णयानंतर यंदा बहुतेक केंद्रांमध्ये उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले . त्याचवेळी उशीरा येणाऱ्या मुंबई आणि पुण्यातील ११  विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले.  मात्र, राज्यमंडळाकडून परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी करण्यात येणारे नवनवे नियम आणि प्रयत्न निरूपयोगी ठरवत गैरप्रकाराचे प्रकार यंदाही चुकले नाहीत. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सोलापूर येथे परीक्षेदरम्यान समाज माध्यमांवर प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्याचा प्रकार समोर आला. तर प्रश्नपत्रिकांच्या मूल्यमापनावर शिक्षकांच्या बहिष्काराची टांगती तलवार कायम आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बुधवारपासून बारावीची परीक्षा सुरू झाली. बारावीच्या परीक्षेत गेल्यावर्षी गाजलेले प्रश्नपत्रिका फुटण्याचे सत्र यंदा रोखण्यासाठी राज्यमंडळाकडून नवे नियम करण्यात आले. परीक्षा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा खोलीत प्रवेश देण्यासाठी मज्जाव करण्यात आला. मंडळाच्या या नियमामुळे काही प्रमाणात उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले. सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दहा वाजल्यापासूनच केंद्रावर हजेरी लावली होती. अनेक ठिकाणी केंद्रावर उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला नाही.

मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्य़ातील ९ विद्यार्थ्यांना उशीरा पोहोचल्यामुळे परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात आला. पहिल्याच दिवशी एकूण १५ विद्यार्थी उशीरा आले. गेल्यावर्षी ३० ते ४० विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशीरा गेले होते. त्यापैकी सहा विद्यार्थी हे दहा ते वीस मिनिटापर्यत परीक्षा केंद्रावर पोहचले होते. त्या विद्यार्थ्यांना त्यांचे उशिरा येण्याची कारणे विचारुन, त्यांच्याकडून लेखी लिहून घेऊन, चौकशी करून त्यांना प्रवेश दिला गेला. मात्र त्यापैकी ९ जण हे साडेअकरानंतर केंद्रावर पोहचल्याने त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. जाहीर केल्या गेलेल्या निर्धारित वेळेपेक्षा काही अंशी सूट देऊनही जे विद्यार्थी उशिरा आले त्यांना प्रवेश नाकारण्यात आले.

पुणे विभागात साधारण सहा विद्यार्थ्यांबाबत विभागीय मंडळाकडे परीक्षा केंद्राकडून परवानगी मागण्यात आली होती. त्यापैकी चार विद्यार्थ्यांची कारणे समर्पक वाटल्यामुळे त्यांना प्रवेश देण्यात आला मात्र दोन विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला अशी माहिती पुणे विभागाचे अध्यक्ष बी. के. दहिफळे यांनी दिली.

गैरप्रकार सुरूच

राज्यमंडळाने पुरेशी काळजी घेतली असल्याचे सांगूनही यंदा परीक्षेच्या पहिल्याच दिवशी गैरप्रकार समोर आला. बार्शी तालुक्यातील तांबेवाडी तांडय़ावरील परीक्षा केंद्रावर परीक्षा संपण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध झाली. तांबेवाडी येथे ज्ञानदीप आश्रमशाळा तथा कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर इंग्लिश विषयाचा पेपर देण्यासाठी ३९४ विद्यार्थ्यांपैकी ३०१ विद्यार्थी हजर होते. परीक्षा सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्ध्यातासाच्या आत प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राबाहेर पसरली.

परीक्षा केंद्र संरक्षित भिंत व लोखंडी तारांच्या जाळीने बंदिस्त आहे. परीक्षा केंद्रात आठ पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यामुळे बाहेरून कॉपी आत येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. केंद्र प्रमुख सकाळी १०.४५ पासून परीक्षा केंद्रावर हजर होते. त्यांच्या ताब्यात तेथील सर्व पर्यवेक्षकांचे मोबाइल संच होते. प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार घडला नसल्याचा केंद्र प्रमुखांनी लेखी जबाब दिला आहे. परीक्षा केंद्राभोवती संपूर्ण गावात झेरॉक्स दुकान आढळून आले नाही. मात्र पेपर फुटीबाबत जी चित्रफीत समाज माध्यमांवर उपलब्ध झाली आहे, त्याची सायबर क्राईम विभागामार्फत चौकशी व्हावी, अशी शिफारस चौकशी अधिकाऱ्यांनी केली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे यांच्या सूचनेनुसार गट शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांची या प्रकरणाची चौकशी केली. दरम्यान राज्यभरात ६४ विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याची नोंद राज्यमंडळाने केली आहे. त्यातील सर्वाधिक म्हणजे २१ प्रकरणे अमरावती विभागात आढळून आली.

सोलापूरमध्ये प्रश्नपत्रिका व्हॉट्स अ‍ॅपवर

सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील तांबेवाडी तांडय़ावरील परीक्षा केंद्रावर अर्ध्या तासातच इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध झाली. या प्रश्नपत्रिकेची आणि त्याच्या उत्तरसूचीची विक्री झाल्याची चर्चाही विद्यार्थ्यांमध्ये होती. मात्र प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे किंवा कोणताही गैरप्रकार नसल्याचा अहवाल शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे.

‘यंदा उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांवर करडी नजर ठेवण्यात आली होती. जास्तीत जास्त ११.१० ते ११.२० पर्यत उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला. मात्र साडेअकरानंतर एकाही परीक्षार्थींना प्रवेश दिला नाही        -डॉ. सुभाष बोरसे, मुंबई विभागाचे सचिव