‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या बारावीच्या ‘बुक कीपिंग अ‍ॅण्ड अकाऊंटन्सी’ या विषयाची प्रश्नपत्रिका दुपारी परीक्षा सुरू असतानाच ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर फिरू लागल्याने पेपरफुटीच्या अफवेला उधाण आले होते. परंतु परीक्षा ११ वाजता सुरू झाल्यानंतर तब्बल तासाभराने प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवरून फिरू लागली होती. त्यामुळे पेपर फुटल्याची शक्यता मुंबईच्या विभागीय शिक्षण मंडळाने फेटाळून लावली आहे.
बारावीच्या वाणिज्य शाखेच्या ‘बुक कीपिंग अ‍ॅण्ड अकाऊंटन्सी’ या विषयाची परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू झाली. परीक्षा सुरू झाल्यानंतर जवळपास तासाभराने ती व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध होती. परिणामी पेपरफुटीच्या चर्चेला उधाण आले. काही शिक्षकांनी हा प्रकार विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र परीक्षा सुरू झाल्यानंतर सुमारे तासाभराने प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्याने याला पेपर फुटला असे म्हणता येणार नाही, असे स्पष्ट करत मुंबई विभागीय मंडळाचे सचिव सि. य. चांदेकर यांनी पेपरफुटीची शक्यता फेटाळून लावली. मात्र परीक्षा सुरू झाल्यानंतर तासाभरातच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर कशी आली, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.
परीक्षा केंद्रात सेलफोन नेण्यास बंदी आहे, असे असतानाही प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू असतानाच व्हॉट्सअ‍ॅपवर कशी आली, असा प्रश्न आहे. याचा अर्थ कुठल्या तरी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांने सेलफोन नेला असावा आणि प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र काढून ते व्हॉट्सअ‍ॅपवरून बाहेर पाठविले आहे. या मार्गाने तो कॉपीही करू शकतो, अशी शक्यता मंडळाच्या एका सदस्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर लक्षात आणून दिली.