विद्यार्थी आणि पालकांच्या दबावामुळे अखेर शालेय शिक्षण विभागाने बारावीच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला असून, रसायनशास्त्राची परीक्षा २७ फेब्रुवारीऐवजी २६ मार्चला, तर जीवशास्त्राची ४ मार्चऐवजी १७ मार्चला घेण्याचे ठरविले आहे. या वेळापत्रकात बदल व्हावेत, यासाठी ‘लोकसत्ता’ने पाठपुरावा केला होता.
बारावीच्या विज्ञान आणि गणित विषयाचा अभ्यासक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) धर्तीवर बदलण्यात आला असून, नव्या अभ्यासक्रमाचे विस्तृत स्वरूप पाहता गणित आणि विज्ञान या मुख्य विषयांच्या परीक्षांमध्ये असलेले एका दिवसाचे अंतर चार ते पाच दिवस करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने विद्यार्थी-पालकांकडून होत होती. या पाश्र्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. १७ मार्चला रविवारी सुट्टीच्या दिवशी जीवशास्त्राची परीक्षा होणार आहे. मात्र, सुधारित वेळापत्रकानुसार रसायनशास्त्राची परीक्षा २६ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याने जेईई, नीट आदी राष्ट्रीय प्रवेश परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे. कारण दोनच आठवडय़ांनी (८ एप्रिल) राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना जेईईला सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतर ५ मे (नीट), १६ मे (राज्य सरकारची सीईटी) आदी क्रमाने महत्त्वाच्या प्रवेश परीक्षा होणार आहेत.
सुधारित वेळापत्रकामुळे भौतिकशास्त्र आणि गणित विषयाच्या परीक्षांमध्ये तीन दिवसांचे अंतर राहणार आहे, तर जीवशास्त्रासाठी १६ आणि रसायनशास्त्रासाठी आठ दिवसांचे अंतर असेल. रसायनशास्त्राची परीक्षा २६ मार्चला बारावीच्या सर्व विषयांच्या परीक्षा आटोपल्यानंतर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे, माहिती-तंत्रज्ञान हा विषय वगळता अन्य विषयांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा जिथे ११ मार्चपर्यंत आटोपत होती तिथे या सर्व विद्यार्थ्यांना २६ मार्चपर्यंत परीक्षा संपण्याची वाट पाहावी लागणार आहे. बारावीच्या इतर विषयांच्या वेळापत्रकात बदल करणे शक्य नव्हते. रसायनशास्त्राची परीक्षा आणखी अलीकडे आणण्यासाठी ती १० मार्चला ठेवावी लागली असती. पण, त्या दिवशी महाशिवरात्र असल्याने १० मार्चचा विचार करता आला नाही. परिणामी २६ मार्चपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्यात गत्यंतर नव्हते, असे स्पष्टीकरण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी केले.

‘विद्यार्थ्यांनी बाऊ करू नये’
सीबीबीएसईची विज्ञानाच्या मुख्य विषयांची परीक्षा २० मार्चला संपते आहे. त्यापेक्षा आणखी सहा दिवस बारावीची परीक्षा लांबणार आहे. दोन्ही मंडळांच्या विद्यार्थ्यांना जेईईच्या तयारीसाठी साधारणपणे सारखाच वेळ मिळत असताना विद्यार्थ्यांनी याचा बाऊ करू नये, असे मत शिक्षकाने व्यक्त केले.