पर्यवेक्षकांना पाणी आणून देण्यापासून रसायनशास्त्राच्या प्रात्यक्षिक परीक्षेकरिता द्रावण तयार करण्याची कामे करणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या असहकारामुळे राज्यभरातील बहुतेक कनिष्ठ महाविद्यालयांतील बारावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षांचे काम विस्कळीत झाले आहे.
‘पाचवा व सहावा वेतन आयोग लागू करताना राहिलेल्या त्रुटी दूर करा, बारावीपर्यंतच्या शिक्षकांप्रमाणे आमच्याही पाल्यांना मोफत शिक्षण द्या’ आदी मागण्यांसाठी राज्यातील तब्बल ३५ हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बारावी परीक्षेच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ‘महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघा’नेही असहकाराची भूमिका घेतली असून, त्याचा प्रभाव झेवियर्स, जयहिंद, एसआयईएस, सोमय्या आदी काही हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकी महाविद्यालये वगळता राज्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांतून दिसून येत आहे. ज्या महाविद्यालयांमधून संघाचे कार्यकर्ते सक्रिय नाहीत तसेच ज्या ठिकाणी बहुतांश शिक्षकेतर कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत त्या महाविद्यालयांना या असहकाराचा फारसा फटका बसलेला नाही. पण, उर्वरित बहुतेक महाविद्यालयांना या आंदोलनाची झळ बसली आहे. सफाई कर्मचाऱ्यांपासून रजिस्ट्रापर्यंतचे कर्मचारी शिक्षकेतरांमध्ये येतात. हे कर्मचारी उच्चशिक्षण विभागाच्या वेतनश्रेणीवर असले तरी जिथे पदवी महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न आहे तिथे त्यांना बारावी परीक्षेचे कामही करावे लागते. यामुळे त्यांच्या आंदोलनाची झळ बारावीच्या परीक्षांनाही बसते आहे.
तर प्रात्यक्षिक व तोडी परीक्षा १८ फेब्रुवारीपर्यत  संपवायच्या आहेत.  कर्मचाऱ्यांच्या असहकारामुळे परीक्षा पुढे ढकलणे सुरूच राहिल्यास त्याचा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या लेखी परीक्षांवर परीणाम होण्याची शक्यता आहे.
मुदतीत परीक्षा पूर्ण होणे कठीण
रूपारेलमध्ये कर्मचाऱ्यांच्या असहकारामुळे गेले दोन दिवस फारच थोडय़ा विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेता आल्या. थोडय़ा फार फरकाने एमडी, रुईया, वझे-केळकर, खालसा, केसी, एसआयडब्ल्यूएस आदी महाविद्यालयांमध्येही हीच स्थिती आहे. कर्मचाऱ्यांअभावी बहुतेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. हा असहकार आणखी दोन-तीन दिवस सुरू  राहिल्यास प्रात्यक्षिक परीक्षा मुदतीत घेणे महाविद्यालयांना कठीण होऊन बसेल, अशी प्रतिक्रिया एका प्राचार्यानी व्यक्त केली.
      जीवशास्त्रातील विच्छेदनासाठी झुरळ पकडून आणण्यापासून बैठक आणि पर्यवेक्षणाची व्यवस्था करणे, उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पोहोचविणे आदी परीक्षाविषयक असंख्य कामात आमच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असतो. पण, आम्हाला सुविधा देताना कायम भेदभाव केला जातो. हे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू.
आर. बी. सिंग,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघ