बारावीतील दहा हजार विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज; प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया लांबणार?

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या बारावी परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने खट्ट झालेल्या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतींसाठी झुंबड उडाली असून सोमवारी दुपापर्यंत मंडळाच्या वाशी येथील कार्यालयात तब्बल ९८६४ विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत विलंब लागणार असल्यामुळे याचा परिणाम मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकावरही होणार आहे. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय कार्यालयाने मुंबई विद्यापीठाकडे प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

बारावीच्या परीक्षेला यंदा मुंबई विभागातून ३ लाख १६ हजार १०५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २ लाख ६५ हजार ४० उत्तीर्ण झाले. यात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणजे सुमारे सहा टक्क्य़ांनी घटला आहे. या घटलेल्या निकालाची चर्चा सुरू असतानाच बहुतांश विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेवरच संशय व्यक्त करत गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत. सुरुवातीला ही प्रक्रिया ऑनलाइन राबवण्यात येत होती. मात्र, दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचा ओघ वाढू लागल्याने आता मंडळाच्या कार्यालयातही अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. त्यानंतरही विद्यार्थ्यांची गर्दी ओसरलेली नसून राजकीय पक्षांनीही या मुद्दय़ावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी आवरण्यासाठी वाशी येथील मंडळाच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सोमवारी दुपापर्यंत मंडळाकडे एकूण ९८६४ विद्यार्थ्यांचे अर्ज आले. यापैकी गुणपडताळणीसाठी १७७७, तर पुनर्मूल्यांकनासाठी आवश्यक असणाऱ्या छायांकित प्रतीसाठी ६०८७ अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांनी दिली. विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने तोंडी परीक्षा, अंतर्गत व प्रात्यक्षिक गुण याबाबत शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे मंडळाने मुंबई विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची तोंडी, अंतर्गत व प्रात्यक्षिक गुणतालिका महाविद्यालयात दर्शनीय भागावर लावण्याचे निर्देश दिले आहेत.

‘‘परीक्षा दिल्यावर गुण किती मिळतील याचा अंदाज असतो. काही गुणांचा फरक पडणे ठीक आहे. मात्र जास्त गुणांचा फरक पडल्यावर शंका येते. हा प्रकार या वर्षी जास्त दिसतो आहे,’’ अशी प्रतिक्रिया प्रवीण जाधव या अर्जकर्त्यां विद्यार्थ्यांने व्यक्त केली. अशीच प्रतिक्रिया सुरेंद्र शहा या पालकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियांबाबत मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम चोख केले आहे. तरीही कुणाला शंका असेल तर छायांकित प्रत देण्यात येत आहे. जास्तीत जास्त ३० दिवसांत ही प्रत दिली जाते. मात्र आम्ही अधिक काम करून सात दिवसांत देण्याचा प्रयत्न करणार आहोत.’’

युद्धपातळीवर पुनर्मूल्यांकन

यंदा पुनर्मूल्यांकनासाठी अधिक अर्ज आल्याने मंडळाकडून सुमारे ४५ कर्मचारी जादा नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच उत्तरपत्रिका पडताळणीच्या कामासाठी सुमारे ८० शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांच्या सुटय़ा पुनर्मूल्यांकनाचे काम पूर्ण होईपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांनी दिली. विभागीय मंडळ स्तरावर विद्यार्थ्यांचे ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र पाच खिडक्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल, अशी हमी त्यांनी दिली. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही या कामाचा आढावा घेतला.

गुणांबाबत शंका का?

बारावीच्या परीक्षेचे स्वरूप यंदा बदलले होते. प्रश्नपत्रिका संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित होती. पर्यायी विकल्प कमी करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रमावर विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करावे लागले. तसेच बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांचे प्रमाण कमी करून दीघरेत्तर प्रश्नांचे प्रमाण वाढविण्यात आले होते. या प्रश्नपत्रिकेचे मूल्यमापन नवीन पद्धतीप्रमाणे करण्यात आल्याने विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना यंदा तुलनात्मकदृष्टय़ा कमी गुण मिळाले असावे, असा अंदाज आहे.

पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया

  • विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो.
  • या अर्जाद्वारे दुसऱ्या दिवशी ‘केस पेपर’ बनतो. त्याआधारे उत्तरपत्रिका शोधली जाते. त्याचा अहवाल तयार केला जातो. नोंदी ठेवून सर्व माहिती तपासणी अधिकाऱ्यांकडे जाते.
  • उत्तरपत्रिकांचे ‘होलॉक्राफ्ट स्टिकर’ काढून त्या उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती काढल्या जातात. सर्व पानांची तपासणी केली जाते.
  • प्रत्येक पानावर मंडळाचा शिक्का व कर्मचाऱ्याची स्वाक्षरी केली जाते.
  • हे झाल्यावर विद्यार्थ्यांला उत्तरपत्रिका घेऊन जाण्यासाठीचा संदेश पाठवला जातो. यासाठी आठ दिवस लागू शकतात.