दहावी-बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाऊ नये म्हणून मे महिन्याच्या अखेरीस फेरपरीक्षा घेण्यात येणार असून त्यासाठी दहावीचा निकालही जूनऐवजी बारावीप्रमाणे मे महिन्यातच जाहीर करण्याचा विचार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाऊ नये व त्यांना गुणवत्ता सिद्ध करण्याची आणखी संधी मिळावी यासाठी साधारणपणे मे महिन्याच्या अखेर त्यांची फेरपरीक्षा घेऊन लगेचच म्हणजे जून महिन्यात निकाल देण्यात येईल. या वर्षी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
बदल नक्की कसा?
सध्या कमाल दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटीची सुविधा दिली जाते. म्हणजे या विद्यार्थ्यांना पुढील वर्षांला (अकरावी) प्रवेश घेता येतो. अर्थात हा प्रवेश तात्पुरता स्वरूपाचा असतो. परंतु, या विद्यार्थ्यांना ऑक्टोबर आणि मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षांच्या दरम्यान या विषयात उत्तीर्ण व्हावे लागते. अन्यथा त्यांचा अकरावीचा प्रवेश रद्द होतो. परंतु, मे महिन्यातच फेरपरीक्षा घेण्यात आल्या तर सर्वच विद्यार्थ्यांना लगेचच उत्तीर्ण होण्याची संधी मिळेल.