मुंबई पोलिसांच्या निवासस्थांनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या दोन वर्षांत मुलुंड, घाटकोपर आणि वाकोला येथे तब्बल १२६४ सदनिका बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या प्रकल्पासाठी गृहनिर्माण आणि शहर विकास महामंडळाने(हुडको) ४२५ कोटी रूपये बुधवारी मंजूर केले असल्याने या प्रकल्पाचे लवकरच सुरू होईल अशी माहिती गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव के.पी. बक्षी यांनी दिली.

मुंबई पोलिस दलातील २४ हजार पोलिस अजूनही सरकारी निवास स्थानापासून वंचित आहेत. त्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी गृह विभागाने शहरात शासनाच्या मालकीच्या जागांवर तसेच जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या माध्यमातून पोलिसांसाठी जास्तीत जास्त घरे बांधण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण कल्याण महामंडळाच्या माध्यमातून १२६४ घरे बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार वाकोला येथे ३६०, मरोळ ४४८, घाटकोपर पूर्व १५६ आणि मुलुंड येथे ३०० अशी घरे बांधण्यात येणार आहेत. ४७५ कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी  हुडकोकडून  ४२५ कोटी रूपयांचे कर्ज घेण्यात आले असून त्यांनीही हे कर्ज मंजूर केले आहे. तसेच राज्य सरकारने ५० कोटी रूपये मंजूर केले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे काम दोन वर्षांत पूर्ण होईल.