मुंबईतील वांद्रे स्टेशनबाहेर पुन्हा एकदा स्थलांतरित मजुरांची गर्दी दिसून आली आहे. वांद्रे स्टेशनहून एक श्रमिक स्पेशल ट्रेन बिहारसाठी सुटणार आहे. या ट्रेनसाठी साधारण एक हजारच्या आसपास लोकांनी बुकिंग केलंय. त्यांना या ट्रेनने जाण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र तरीही वांद्रे स्टेशनच्या बाहेर गर्दी पाहण्यास मिळते आहे. ज्या लोकांनी या ट्रेनसाठीचे बुकिंग केले नाही त्या स्थलांतरित मजुरांचीही गर्दी वांद्रे स्टेशन बाहेर पाहण्यास मिळते आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलीसही आले आहेत जे मजुरांना पांगवण्याचं काम करत आहेत.

याआधी १४ एप्रिल रोजी अशाच प्रकारची गर्दी झाल्याचं पाहण्यास मिळालं होतं. आता पुन्हा एकदा वांद्रे स्टेशनबाहेर गर्दीचा महापूर उसळला आहे. या गर्दीला पांगवण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रय़त्न करत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला. सध्या लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु आहे. अशात सर्वाधिक हाल झाले ते स्थलांतरित मजुरांचे. त्यांची काळजी घेण्यासाठी राज्य सरकारं झटत आहेत. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आत्तापर्यंत ५ लाख मजुरांना त्यांच्या गावी पाठवलं आहे यापुढेही पाठवू असं सांगितलं मात्र त्यांनी थोडा संयम पाळावा असंही स्पष्ट केलं.

असं असलं तरीही वांद्रे स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली पाहण्यास मिळते आहे. राज्य सरकारने केंद्राची संमती घेऊन श्रमिक स्पेशल ट्रेन्स सुरु केल्या आहेत. मात्र या ट्रेन्समधून आधी नोंदणी केलेल्या मजुरांनाच घरी पाठवण्यात येतं आहे. अशात आज बिहारला जाणाऱ्या ट्रेनसाठी सुमारे १ हजारच्या आसपास मजुरांनी नोंदणी केली आहे. या मजुरांशिवाय ज्या मजुरांनी नोंदणी केली नाही अशाही मजुरांनी वांद्रे स्टेशनबाहेर गर्दी केली आहे. पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही माहिती ANI शी बोलताना दिली.