साहित्य-संस्कृती
पाल्रे टिळक विद्यालयाच्या पटांगणात सुरू असलेल्या हृदयेश फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अवघ्या कानसेनांच्या श्रुती धन्य झाल्या त्या पं. शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनामुळे, मात्र त्याच वेळी या रसिकांची अवस्था ‘जब रात है ऐसी मतवाली तो सुबह का आलम क्या होगा’ अशी झाली होती. या उत्कंठेचे कारण म्हणजे रविवारची प्रभात मैफल. या मैफलीत रंग भरण्यासाठी साक्षात गानसरस्वती किशोरी आमोणकर दाखल होणार होत्या.
‘लोकसत्ता प्रस्तुत’ व ‘जयसत्य चॅरिटेबल ट्रस्ट’च्या सहयोगाने सुरू असलेल्या या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी पहाटे साडेसहा वाजता प्रेक्षागार तुडुंब भरले होते.
चिंतनशील गाण्यासाठी ख्यातकीर्त असणाऱ्या किशोरीताईंनी तोडी रागातील ख्यालाद्वारे मैफलीची सुरुवात केली. एवढय़ा सकाळी षड्ज लागणे गायकांसाठी खरे तर खूप कठीण. मात्र, प्रतिभा, अनुभव आणि तपश्चर्या या गोष्टींमुळे कलाकार किती उंची गाठतो, याचा प्रत्यय त्यांच्या गायकीतून रसिकांना आला. वाढत्या वयाला झुगारून त्यांनी सादर केलेल्या बिनतोड तोडीच्या सौंदर्यात रसिक मंत्रमुग्ध झाले. उत्तरार्धात त्यांनी ललत पंचम हा प्रसन्न राग निवडला. या स्वरांची मोहिनी एवढी की उत्तरार्धात उन्हे जाणवू लागल्यानंतरही एकही रसिक जागचा हलला नाही. अडीच तास चाललेल्या या मैफलीत तबल्यावर भरत कामत, संवादिनीवर सुयोग कुंडलकर व व्हायोलिनवर मिलिंद रायकर यांनी यथोचित साथ केली. किशोरीताईंची शिष्या व नात तेजश्री आमोणकर तसेच नंदिनी बेडेकर यांनी तानपुऱ्यावर साथ करताना गायकीचेही पैलू दाखविले.
संध्याकाळच्या सत्राची सुरुवात ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या गाण्याने झाली. त्यांनी पूरिया व तिलक कामोद राग सादर केले. ३५ वर्षांपासून साथ देणाऱ्या पं. सुरेश तळवलकर यांच्या तबलावादनालाही रसिकांनी भरभरून दाद दिली.
त्यानंतर नीलाद्रीकुमार यांची सतार झंकारली.  विजय घाटे यांचा तबला व सतारची जुगलबंदी चांगलीच रंगली.
या वातावरणाचा कळसाध्याय रचला तो पतियाळा व किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांनी. गोरख कल्याण हा अतिशय गोड राग त्यांनी आळविला. नंतर हंसध्वनीमधील तराणा आणि मिश्र पिलूमधील ‘तुम राधे बनो शाम’ ही ठुमरी गाऊन त्यांनी रसिकांची वाहवा मिळविली. मुकुंदराज देव यांच्या तबलावादनानेही रसिकांच्या टाळ्या वसूल केल्या. दरम्यान, वयाची साठी पूर्ण करणारे पं. उल्हास कशाळकर यांचा सुरेश तळवलकर यांच्या हस्ते या वेळी आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला. पाल्र्यातील ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांनाही साठीनिमित्त पं. कशाळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
अकरा लाखांची देणगी
गानयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी हिराबाई बडोदेकर व सुरेशबाबू माने या गुरूंच्या स्मरणार्थ ‘हृदयेश आर्ट्स’च्या माध्यमातून या महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. वयाच्या पंचाहत्तरीनंतर वैयक्तिक कारणास्तव त्या आयोजनातून बाजूला झाल्या, त्यानंतर महोत्सव ‘हृदयेश फेस्टिव्हल’ या नावाने ओळखला जाऊ लागला. गेल्या पंचवीस वर्षांत येथे देशातील सर्व विख्यात कलाकारांनी कला सादर केली असून त्यास रसिकांचाही भरभरून प्रतिसाद लाभला आहे, असे ‘हृदयेश’चे प्रमुख अविनाश प्रभावळकर यांनी सांगितले. नवीन गायक घडविणाऱ्या डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनला या रौप्यमहोत्सवा-निमित्त अकरा लाख रुपयांची थैली देत आहोत, अशी घोषणा त्यांनी केली.