05 July 2020

News Flash

कुलाब्यातील ‘मेट्रो हाऊस’ला आग

समन्वयाच्या अभावामुळे काही काळ पाण्याचा तुटवडा; साडेसहा तासांनंतर नियंत्रण

आगीने सायंकाळच्या सुमारास अक्राळविक्राळ रूप धारण केले

समन्वयाच्या अभावामुळे काही काळ पाण्याचा तुटवडा; साडेसहा तासांनंतर नियंत्रण
कुलाबा येथील रिगल थिएटरजवळील शहीद भगतसिंग मार्गावरील ‘मेट्रो हाऊस’ला गुरुवारी दुपारी लागलेल्या आगीने सायंकाळच्या सुमारास अक्राळविक्राळ रूप धारण केले. रात्री साडेदहाच्या सुमारास आग आटोक्यात आली. ७० टक्के इमारतीचा भाग वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. शहरातील वाहतूकीमुळे १५ ते २० मिनिटांसाठी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी वाहतूक वेळीच वळवल्याने पाणी उपलब्ध झाले. असे मुख्य अग्निशमन अधिकारी पी. एस. रहांगदळे यांनी स्पष्ट केले. तसेच संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली नसून इमारतीच्या आतील लाकडी जिने संपूर्ण जळून खाक झाले आहेत. मात्र इमारत सुरक्षित असल्याचेही रहांगदळे यांनी सांगितले. दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास लागलेली आग साडेसहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आली असून अग्निशमन दलातर्फे रात्री उशिरापर्यंत कूलिंग ऑपरेशन सुरू होते.
पालिका अधिकारी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे काही काळ पाणीपुरवठा होऊ न शकल्यामुळे सायंकाळच्या सुमारास आग भडकली. दरम्यान, या आगीत जीवितहानी झाली नाही, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला.
‘मेट्रो हाऊस’ला दुपारी ४ च्या सुमारास आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशमन दलाचे १२ बंब, चार जंबो आणि इतर पाच टँकर, चार रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाले. मात्र आग आटोक्यात येत नसल्यामुळे अग्निशमन दलाचे आणखी सहा बंब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. आग लागली त्या वेळी कुलाबा परिसरातील पाणीपुरवठा सुरू होता. त्यामुळे आग विझविण्यासाठी रस्त्यावरील नळखांबातून (हायड्रंट) पाणी उपलब्ध झाले. मात्र पाणीपुरवठय़ाची वेळ संपताच टँकरमधील पाण्याची आगीवर फवारणी करण्यात आली. मात्र टँकरमधील पाणी संपल्यानंतर आझाद मैदानातून अग्निशमन दलाच्या जवानांना आझाद मैदानावर धाव घ्यावी लागली. सीएसटी परिसरात प्रचंड वाहतुकीमुळे आझाद मैदानातून पाणी भरून टँकर घटनास्थळी रवाना होताना वाहतूक कोंडीचा फटका बसला. या दरम्यान कुलाबा विभागाचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याची सूचना करण्यात आली. कुलाबा विभागाचा पाणीपुरवठा सुरू झाल्यावर नळखांबातून पाणी उपलब्ध झाले. दरम्यान, सुरुवातीला पाणी उपलब्ध नसल्याने आगीने ‘मेट्रो हाऊस’च्या वरच्या मजल्यांनाही घेरले. इमारत लाकडी असल्याने आणि छतावर डांबराचे आच्छादन केल्यामुळे आग भडकत गेली.
‘मेट्रो हाऊस’ समोर फेरीवाल्यांनी दुकाने थाटल्यामुळे आग विझविताना अनेक अडथळे येत होते. त्यामुळे या फेरीवाल्यांना हटविण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत.

परदेशी नागरिकांची होरपळ
आग लागलेल्या मेट्रो हाऊस इमारतीमध्ये सुमारे सहा निवासी हॉटेल आहेत.आफ्रिकेतील एक जोडपे मेरिनो रेसिडेन्सी येथे वास्तव्यास होते. दुपारी तीनच्या सुमारास ते खाली उतरले होते. मात्र आल्यानंतर मेरिनो रेसिडेन्सीला आग लागली. खर्चाचे पैसे, खरेदी केलेल्या वस्तू सर्वच हॉटेलमध्ये होते. जवळ पैसे नसल्यामुळे आता काय करायचे, असा प्रश्न त्यांना पडला. अनेक परदेशी नागरिकांचे पासपोर्ट हॉटेलमध्ये असल्यामुळे ते मिळविण्यासाठी त्यांनी पोलिसांच्या मागे ससेमिरा सुरू केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 2:32 am

Web Title: huge fire in building on colaba causeway in south mumbai
Next Stories
1 रेल्वेच्या ‘हमसफर’ सप्ताहातच प्रवासी सर्वाधिक हतबल!
2 झोपडय़ांच्या इमल्यांपुढे पूल थिटा
3 आझाद मैदानात आंदोलन नाटय़ रंगले
Just Now!
X