03 March 2021

News Flash

मेट्रो हाऊस अजून धुमसतेय..

या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील व्हिनस हॉटेलला लागलेली आग वाढून चौथ्या माळ्यापर्यंत पोहोचली

नुकसानीमुळे व्यापारी हतबल
कुलाब्याच्या मेट्रो हाऊसला गुरूवारी सायंकाळी लागलेल्या आगीमुळे या इमारतीत असलेल्या मेट्रो प्लाझा, मॅकडोनल्ड, हॅबिटसारख्या दुकानांचेही चांगलेच नुकसान झाले आहे. शुक्रवारी पहाटे आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, येथील खोल्यांमध्ये आग अजुनही धुमसते आहे.
या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील व्हिनस हॉटेलला लागलेली आग वाढून चौथ्या माळ्यापर्यंत पोहोचली आणि चौथा मजला जळून राख झाला. या इमारतीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर चार घरे आणि सहा निवासी हॉटेल आहेत. तसेच मेट्रो प्लाझा, मॅकडोनल्ड, हॅबिटसारखी खाद्यपदार्थ, चपला आदी मोठय़ा दुकानांबरोबरच मोबाईल, कपडे, सोनेचांदी छोटीमोठी दुकाने या इमारतीत आहेत. ही सर्व दुकाने आगीच्या विळख्यात सापडल्यामुळे एरवी संध्याकाळी ग्राहकांना तोंड देणारे इथले व्यावसायिक आग आटोक्यात येऊन दुकानांचा ताबा आपल्याला कधी मिळेल, या प्रतिक्षेत हतबलपणे या परिसरात फिरत आहेत.
बराच वेळ आग आटोक्यात येत नसल्यामुळे त्यांच्याकडे पोलिसांच्या आदेशाचे पालन करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पहाटे सुमारे ४ च्या सुमारास ही आग आटोक्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र काही ठिकाणाहून अद्यापही धूर येत आहे. तसेच, इमारतीच्या काही भागावर तडे गेले असल्याचे दिसत आहेत. मात्र, काही परदेशी नागरिकांना पासपोर्ट आणि तत्सम महत्त्वाच्या वस्तू आणण्यासाठी इमारतीत सोडले जात आहे.
इमारतीच्या समोरील शहीद भगत सिंह मार्गावरील दुहेरी रस्त्यावरील एक मार्ग रहदारीसाठी मोकळा करण्यात आला आहे. मेट्रो हाऊसमधील दुकाने वगळता इतर कुलाबा बाजार मात्र सुरळीत सुरू आहे.

यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव मारक
‘मेट्रो हाऊस’ला गुरुवारी लागलेली आग पाण्याअभावी भडकत गेली आणि इमारतीचा बराचसा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. पाणीपुरवठा सुरू ठेवण्याबाबत पालिका, अग्निशमन दलमधील समन्वयाच्या अभावाचा ‘मेट्रो हाऊस’ला फटका. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमनात हलगर्जीपणा केल्यामुळे आझाद मैदानावरुन पाणी भरुन निघालेले टँकर घटनास्थळी वेळेवर पोहोचू शकले नाहीत. आपत्ती काळात या सर्वामध्ये समन्वय राखण्यात पालिकेच्या आपत्कालिन व्यवस्थापन विभागालाही अपयश आल्याचे स्पष्ट होत आहे.
कुलाब्यामधील शहीद भगतसिंग मार्गावर कायम देशी-विदेशी पर्यटकांची वर्दळ असते. वेगवेगळ्या ब्रॅण्डेड कंपन्यांची दुकाने या भागात आहे. त्यामुळे येथे कायम मुंबईकरांचीही गर्दी असते. पर्यायाने या मार्गावर वाहतुकीची प्रचंड वर्दळ असते. या सर्व गोष्टी ‘मेट्रो हाऊस’ला आग लागल्यानंतर लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी शहीद भगतसिंग मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवून मदतकार्याला हातभार लावला. पोलिसांनीही या भागात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मात्र तरीही बघ्यांची गर्दी आणि समाजसेवकांच्या अतिउत्साहाचा अडथळा मदतकार्यात येत होता.

इमारतीत जाण्याच्या परवानगीची प्रतीक्षा
या आगीमुळे व्यावसायिकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, ते इमारतीत जाण्याची परवानगी कधी मिळेल, या प्रतिक्षेत इथेच ताटकळत थांबून आहेत. तळमजल्यापर्यंत आग पोहोचली नसली तरी पाण्याच्या फवारणीमुळे दुकानातील कपडे, वस्तू यांचे नुकसान झाले असण्याची शक्यता काही दुकानदारांनी वर्तवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 2:23 am

Web Title: huge fire in building on colaba causeway in south mumbai 2
Next Stories
1 संघालाही खडसे नकोसे!
2 पाच वर्षांत मेट्रो ठाण्यात!
3 खाऊखुशाल : श्री अन्नपूर्णा  आरोग्यवर्धक सोशल अड्डा
Just Now!
X