शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेवरील चौथरा व मंडप हटविण्याच्या हालचालींनी वेग घेतल्याची कुणकुण लागताच हजारो शिवसैनिकांनी शनिवारी शिवाजी पार्कवर धाव घेतली. कोणत्याही परिस्थितीत चौथरा हटवू देणार नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली असून, त्यामुळे तणाव वाढला आहे. शीघ्र कृती दलासह मोठय़ा प्रमाणावर पोलीस दल शिवाजी पार्क परिसरात तैनात करण्यात आले आहे.
राज्य शासन, उच्चपदस्थ पोलीस व महापालिका अधिकारी यांच्यात दुपारपासून चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. पण त्यात कोणताही मार्ग निघाला नसल्याने शासन व महापालिका पेचात असून स्मारकाचा तिढा कायम आहे. शिवसेनाप्रमुखांवरील अंत्यसंस्कारासाठी शिवाजी पार्कवरील जागा वापरण्यासाठी तात्पुरती परवानगी शिवसेनेला देण्यात आली होती. चौथरा व मंडप हटविण्यासाठी महापालिकेने खासदार संजय राऊत आणि महापौर सुनील प्रभू यांना नोटीसही दिली आहे. या पाश्र्वभूमीवर महापरिनिर्वाणदिनानंतर महापालिका व राज्य शासनाने चौथरा व मंडप हलविण्यासाठी तयारी सुरू केल्याची कुणकुण होती. त्याबाबत समजताच इतर ठिकाणच्या शिवसैनिकांसह आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातून शेकडो कार्यकर्ते दाखल झाले. गर्दी वाढू लागल्यावर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. भगवे झेंडे घेतलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी मंडपात जाऊन शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. शिवसेना नेते मनोहर जोशी, खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे नेते व पदाधिकारी शिवाजी पार्कवर आले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. चौथरा व मंडपाच्या संरक्षणासाठी शिवसेना कार्यकर्ते रात्रंदिवस शिवाजी पार्कवर तळ ठोकणार आहेत.
सरकार, पालिकेपुढे पेच
पोलीस आयुक्त डॉ. सत्यपालसिंह, सहआयुक्त सदानंद जाते, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात शनिवारी प्रदीर्घ चर्चा झाली. विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. शिवसैनिकांना हटविण्यासाठी बळाचा वापर केल्यास त्याचे पडसाद राज्यभर उमटतील. अधिवेशनातही तीव्र प्रतिक्रिया उमटेल. हा भावनात्मक मुद्दा सफाईने व कौशल्याने हाताळला नाही आणि पोलिसांनी जबरदस्ती केली तर कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, यावर विचार करण्यात आला. राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय महापालिका आयुक्त सीताराम कुंटे स्वतहून कोणताही निर्णय घेणार नाहीत, हेही स्पष्ट झाले.     
सरकार, पालिकेपुढे पेच
पोलीस आयुक्त डॉ. सत्यपालसिंह, सहआयुक्त सदानंद दाते, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात शनिवारी प्रदीर्घ चर्चा झाली. विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. शिवसैनिकांना हटविण्यासाठी बळाचा वापर केल्यास त्याचे पडसाद राज्यभर उमटतील. अधिवेशनातही तीव्र प्रतिक्रिया उमटेल. हा भावनात्मक मुद्दा सफाईने व कौशल्याने हाताळला नाही आणि पोलिसांनी जबरदस्ती केली तर कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, यावर विचार करण्यात आला. राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय महापालिका आयुक्त सीताराम कुंटे स्वतहून कोणताही निर्णय घेणार नाहीत, हेही स्पष्ट झाले.

बाळासाहेब म्हणजे हिंदुत्व, महाराष्ट्र आणि मराठी माणूस. ही जागा आता लाखोंचे श्रद्धास्थान आहे. जोपर्यंत आकाशात सूर्य-चंद्र आहेत, तोपर्यंत या स्मृती पुसल्या जाऊ शकत नाहीत. सरकार किंवा कायद्याने त्यात हस्तक्षेप करू नये.    
खा. संजय राऊत</strong>


सरकारने काही चर्चा केली असती, तर ही तणावाची परिस्थिती निर्माण झाली नसती. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. सरकारकडून काही प्रस्ताव आल्यास विचार करू.
मनोहर जोशी

शिवाजी पार्कवर आज हजारो शिवसैनिक दाखल झाले, उद्यापासून लाखो येतील. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, असे काहीही सरकारने करू नये. – एकनाथ शिंदे