अपुऱ्या जलसाठय़ामुळे यंदा खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्य़ाच्या शहरी भागात दिवाळीपासूनच १४ टक्केपाणीकपात लागू करण्यात आली असतानाच वनराई बंधाऱ्यांच्या अभावामुळे यंदा ग्रामीण भागातील जनतेस आतापासूनच पाणीटंचाईचा झळा सोसाव्या लागण्याची चिन्हे आहेत. यंदा ठाणे जिल्ह्य़ात एकूण २२०० वनराई बांधण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याची अखेर आली तरी त्यापैकी केवळ ९० वनराई बंधाऱ्यांचीच कामे पूर्ण होऊ शकली आहेत. जिल्ह्य़ात ठिकठिकाणी सध्या आणखी ५५ वनराई बंधाऱ्यांची कामे सुरू आहेत. आधीच यंदा तुलनेने जिल्ह्य़ात पाऊस कमी झाला, त्यात वनराई बंधारे बांधण्याच्या कामास तब्बल दीड महिना उशीर होऊन सध्या याबाबतीत केवळ पाच टक्केकामे पूर्ण होऊ शकल्याने जिल्ह्य़ापुढील पाणी संकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत.  
गेल्या वर्षी मुबलक पाऊस पडूनही ग्रामीण भागातील जनतेला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. मोखाडा तालुक्यातील एका महिलेचा तर पाणी मिळविताना झालेल्या चेंगराचेंगरीत गुदमरून मृत्यू ओढावला होता. वनराई बंधाऱ्यामुळे  एरवी डिसेंबरअखेर आटणाऱ्या ओढय़ा-नाल्यांना फेब्रुवारी महिन्यापर्यंत जीवदान मिळते. ग्रामीण भागातील जनतेला तो मोठा आधार असतो. धुणी-भांडी तसेच काही ठिकाणी भाजीपाला पिकविण्यासाठीही या पाण्याचा ग्रामीण भागात वापर होतो. पावसाळा संपल्यावर ऑक्टोबर महिन्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने रोजगार हमी योजनेतून या बंधाऱ्यांची कामे सुरू होतात.
यंदा त्याच काळात पंचायत राज समितीचा दौरा होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची यंत्रणा त्या कामात गर्क होती. त्यानंतर दिवाळी झाली. आता गेल्या काही दिवसांपासून रोजगार हमी योजनेची कामे जोरात सुरू आहेत, मात्र महिनाभरात अनेक ओढय़ा-नाल्यांमधून बरेच पाणी वाहून गेले असून, उद्दिष्टपूर्तीसाठी बंधारे बांधलेच तरी ते कुचकामी ठरण्याचीच शक्यता आहे.