मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने ‘पायरेटेड’ पुस्तकांचा साठा असलेल्या एका छुप्या गोदामावर टाकलेल्या छाप्यात एक, दोन नव्हे तर तब्बल १३ हजार पुस्तके जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या या पुस्तकांनी समाजसेवा शाखेतील १०० पोती भरली आहेत.  
गेल्या काही महिन्यांपासून मुंबई शहर आणि उपनगरात विशेषत: फोर्ट, चर्चगेट परिसरात मोठय़ा प्रमाणात ‘पायरेटड’ पुस्तकांची विक्री केली जात आहे. नामवंत इंग्रजी प्रकाशकांसह मराठीतील काही प्रसिद्ध प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांचा यात मोठय़ा प्रमाणात वाटा आहे.
वीणा गवाणकर, विश्वास पाटील, पु. ल. देशपांडे, रणजित देसाई, व. पु. काळे आदी लेखकांची पुस्तके विकली जात आहेत. यात ‘एक होता काव्‍‌र्हर’, पार्टनर’, ‘स्वामी’, ‘मृत्युंजय’, ‘पानिपत’, ‘राजा शिवछत्रपती’, बटाटय़ाची चाळ’ आणि अन्य पुस्तकांचा समावेश आहे.  या संदर्भात ‘मराठी पुस्तकांना ‘पायरसी’ची वाळवी’ अशी बातमी ‘लोकसत्ता’मध्ये (७ फेब्रुवारी २०१३) प्रसिद्ध झाली होती. लेखिका वीणा गवाणकर यांनीही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवून ‘पायरेटेड’ पुस्तक विक्रेत्यांच्या विरोधात ठोस कारवाई करण्याविषयी साकडे घातले होते.
पोलिसांनी शीव, कोळीवाडा येथील इंदिरा नगर येथील एका गोदामावर धाड टाकून सुमारे १३ हजार पुस्तके जप्त केली. या कारवाईनंतर जप्त केलेल्या सर्व पुस्तकांची नोंद करण्यात आणि ती पुस्तके पोत्यांमध्ये भरण्यासाठी पोलिसांचे १२ तास खर्ची पडले होते.
या पूर्वी  डिसेंबर महिन्यात वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ लाख रुपयांची ‘पायरेटेड’ पुस्तके जप्त करण्यात आली होती.
शीव, कोळीवाडा येथे केलेल्या कारवाईत ‘संभाजी’, ‘ययाती’, ‘स्वामी’, ‘राऊ’ आणि अन्य अनेक ‘पायरेटेड’ मराठी पुस्तके जप्त करण्यात आली. ‘पायरेटेड’ पुस्तक विक्रेत्यांच्या विरोधात यापुढेही अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचेही या सूत्रांकडून सांगण्यात आले.
‘पायरेटेड’ पुस्तक विक्रेत्यांच्या विरोधात पोलिसांनी शीव, कोळीवाडा येथे केलेल्या या कारवाईविषयी लेखिका वीणा गवाणकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धन्यवाद दिले आहेत.