मुंबईतील शेकडो रिक्षाचालक, मालकांचे मूळगावी प्रयाण

मुंबई : एकीकडे करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वाढत चाललेली भीती आणि दुसरीकडे, टाळेबंदीमुळे रोजगारावर आलेली गदा यामुळे परराज्यातून आलेले कामगार मूळगावी परतत असताना, मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचे साधन असलेल्या रिक्षावाहतुकीवरही याचा परिणाम दिसणार आहे. मुंबईतील शेकडो रिक्षाचालक, मालक आपल्या मूळगावी परतू लागले असून यातील अनेकांनी थेट रिक्षातूनच गावाकडे कूच केली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील टाळेबंदी वाढवल्यानंतर शहरात जगणे कठीण झाल्यामुळे स्थलांतरितांची मूळ गाव गाठण्याची धडपड वाढली. मिळेल ते वाहन, नाहीतर थेट पायीच जाण्याचा पर्याय त्यांनी स्वीकारला. दीड महिना हाताला काम नाही आणि अन्नधान्याची मदत देखील पुरेशी नाही, त्यातच करोनाचा धोका त्यामुळे यांनी हे स्थलांतर सुरू झाले. त्याचबरोबर गेल्या तीन दिवसांत अनेक रिक्षाचालकांनी स्वत:च्या रिक्षाने कुटुंबासहित गावी जाण्यास सुरुवात केली.

रिक्षा युनियनच्या नोंदीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात सुमारे दोन लाख रिक्षामालक आहेत. याशिवाय सुमारे ७० हजारांच्या आसपास रिक्षाचालक आहेत. हे रिक्षाचालक मुख्यत: तरुण आणि परराज्यातून आले आहेत. त्यांची गुजराण रोजच्या कामावरच होते. गेल्या आठ दिवसांतील स्थलांतरितांमध्ये रिक्षाचालकांचे प्रमाण किती असेल याची नोंद नाही, मात्र स्थलांतरितांमध्ये रोजच्या कमाईवरच जगणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने अनेक रिक्षाचालकदेखील शहर सोडून गेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईतील एकूण रिक्षा मालकांपैकी सुमारे सव्वा लाख मालक हे मूळचे उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतील असले तरी १५ वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबईतच राहात आहेत. त्यापैकी सुमारे पाच-सहा हजार मालकांनी रिक्षा घेऊन गावी जाण्याचा मार्ग पत्करल्याचे, मुंबई ऑटो रिक्षा अ‍ॅण्ड टॅक्सी मेन युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले. मुख्यत:

रविवार-सोमवार या दोन दिवसांमध्ये हे प्रमाण अधिक होते. रिक्षाचालकांनीदेखील स्थलांतर केले असले तरी त्यांच्या संख्येचा अंदाज नसल्याचे ते सांगतात. मात्र यामुळे टाळेबंदी संपल्यावर शहरात रिक्षा मालक-चालकांचा तुटवडा भासेल अशी शक्यता कमी असल्याचे ते म्हणाले.

सध्या चौथ्या टप्प्यातील टाळेबंदीनंतरच्या अनिश्चिततेमुळे हातावर पोट असणाऱ्या स्थलांतरितांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. रिक्षा मालकांना सध्या रिक्षाचे पार्किंग भाडे, महिन्याचा हफ्ता या सर्व बाबींची झळ सोसावी लागत असल्याचे रिक्षा मालक रमेश यादव यांनी सांगितले. त्यामुळेच त्यांनी कुटुंबासहीत दोन दिवसांपूर्वी अलाहबादला जाण्यासाठी शहर सोडले.

टॅक्सीचालकांना परवाना द्या

टाळेबंदीमुळे मुंबईतील टॅक्सीचालकांच्याही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनाही परराज्यात जाण्यासाठी तात्पुरता परवाना देण्यात यावा, अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे नेते ए.एल.क्वाड्रोस यांनी राज्य शासनाकडे के ली आहे. मुंबईत ४० हजार टॅक्सी धावतात. काही टॅक्सींवर तर दोन पाळ्यांमध्ये दोन टॅक्सीचालक असतात. यातील बहुतांश चालक हे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड इत्यादी राज्यांतील आहेत, असे ते म्हणाले.

मुंबई-आग्रा महामार्गावर कसारानजीक मुंबईचे रिक्षामालक कुटुंबीयांसहित जाताना, तर मोठय़ा छायाचित्रात मुंबईतील एका रिक्षाथांब्यावर उभ्या करण्यात आलेल्या रिक्षा.

      (छायाचित्र: सुहास जोशी, निर्मल हरिंद्रन)