शनिवारी घेण्यात आलेल्या अखिल भारतीय वैद्यकीय पूर्व परीक्षेस (एआयपीएमटी) केंद्रांवर उशिरा पोहोचल्यामुळे मुंबई व ठाणे परिसरांतील सुमारे ३० विद्यार्थी, तर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामांमुळे झालेल्या वाहतूककोंडीमुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ‘अखिल भारतीय वैद्यकीय पूर्व परीक्षे’साठी मुंबईकडे येणाऱ्या १५० विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले. या संदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ काय निर्णय घेईल याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ९.३० वाजता परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहणे बंधनकारक होते, मात्र केंद्रांवर पोहोचण्यास पाच ते दहा मिनिटे उशीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याने पालकांमध्ये असंतोष पसरला. कुलाबा येथील एका शाळेत परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थी ९.२५ मिनिटांनी पोहोचले, मात्र त्या वेळेस प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. याबाबत पालकांनी विचारणा केल्यावर तेथील सुरक्षा रक्षकाने मुख्याध्यापकांना विचारून येतो असे सांगितले. यानंतर तो सुरक्षा रक्षक दहा मिनिटांनी तेथे परतला व प्रवेश देण्यास मनाई केल्याचे आदेश असल्याचे सांगितले.
शाळेबाहेर सुमारे २० ते २५ विद्यार्थी जमले होते व त्यात विद्यार्थिनींची संख्या जास्त होती. वेळेपेक्षा लवकर येऊनही हा अन्याय का, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. याच वेळी त्या केंद्राच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या केंद्रावर मात्र ९.४० पर्यंत विद्यार्थ्यांना सोडत असल्याचेही पालकांनी नमूद केले.

कल्याण येथील आर्य गुरुकुल शाळेतही असाच प्रकार घडल्याने पालकांनी शाळेच्या सुरक्षा रक्षकाच्या दालनाची काच फोडल्याची तक्रार शाळेने कोसळेवाडी पोलीस ठाण्यात केली आहे. दरम्यान, या प्रकारांबाबत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण अथवा माहिती उपलब्ध झालेली नाही.