अरबी समुद्रातील ‘कयार’ चक्रीवादळ तीव्र झाले असून त्याने शनिवारी कोकण किनारपट्टीला तडाखा दिल्याने काही ठिकाणी पडझड झाली. वादळामुळे मुंबईत तुरळक, तर कोकणासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे.

चक्रीवादळाने मुंबईला वेठीस धरले नसले तरी शनिवारी दिवसभर मुंबईकरांनी पावसाळी हवा आणि कोंदट वातावरणाचा अनुभव घेतला. दुपारनंतर शहर आणि उपनगरात अंधारून आले होते. मात्र पाऊस तुरळक होता. मुंबईत शनिवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत कुलाबा, दादर, वांद्रे, कांदिवली, मुलुंड आणि चेंबूर येथे १ ते ५ मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे, ऐरोली, कोपरखैरणे, मुंब्रा येथेही ५ मिर्मीयत पाऊ स पडला. कुलाब्यात २.२ मिमी, तर सांताक्रूझमध्ये १.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीवरून ओमानच्या दिशेने जात आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत त्याची तीव्रता वाढणार असल्याने ताशी १८० ते २०० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर शुक्रवारी चक्रीवादळात झाले आहे. ते अधिकाधिक तीव्र होत आहे. त्याचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टीसह राज्याच्या विविध भागांत पाऊस झाला. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्य़ात मोठय़ा पावसाची नोंद झाली. पश्चिम महाराष्ट्रत सांगली, सातारा, कोल्हापूरसह बहुतांश ठिकाणी पाऊस झाला. मराठवाडय़ात परभणीलाही पावसाने झोडपून काढले. विदर्भात अकोला, नागपूर, यवतमाळसह विविध ठिकाणी पाऊस पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले.

गोदापात्रालगत अतिदक्षतेचा इशारा

नांदेड जिल्ह्य़ात शुक्रवारी रात्रीपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे जायकवाडीमधून गोदावरीच्या पात्रात पुन्हा एकदा पाणी सोडण्यात आले.  परिणामी विष्णुपुरी जलाशयाचे नऊ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले. त्यामधून एक लाख सात हजार १२५ क्युसेक पाण्याचा गोदावरी पात्रात विसर्ग  सुरू असल्याने नदीकाठावरील गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

खरिपाच्या आनंदावर विरजण : कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे दिवाळसणासह शेतकऱ्यांच्या खरीप पिकाच्या आनंदावर विरजण पडले. काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दारणा गंगापूर कार्यक्षेत्रातही पाऊस होत असल्याने गोदावरी नदीत नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून २ हजार ४२१ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

हिंगोलीत शेतकरी अडचणीत : हिंगोली जिल्ह्य़ात पावसाचा मुक्काम वाढल्याने सोयाबीन, झेंडू, कापसासह खरीप पिकाची दाणादाण उडाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शनिवारी सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत होता. जिल्ह्य़ात सरासरी १७.७१ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

परभणीत कापसाचे नुकसान  : परभणी जिल्ह्य़ात पावसाने वार्षकि सरासरी पार केली असली तरी सेलू, पाथरी, मानवत, सोनपेठ या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने झालेले नुकसान प्रचंड आहे. कापसाचे हाती आलेले पीक गेले असून, सोयाबीनसह अन्य पिकांचेही नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने अर्थसाह्य़ देण्यात यावे, अशी मागणी राजकीय पक्ष, संघटना करू लागल्या आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षासह स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस पक्षानेही शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

बीडमध्ये सोयाबीन, बाजरीला फटका

परतीच्या पावसाने दहा दिवसांपासून मुक्काम ठोकल्याने वार्षकि सरासरीच्या ८६ टक्के पावसाची नोंद झाली असून प्रकल्पातील पाणीसाठय़ात वाढ झाली आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी कापसाच्या जागेवर वाती झाल्याने काढणीला आलेले सोयाबीन आणि बाजरीचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.