चार वर्षांच्या मुलाची साक्ष
आपल्या वडिलांनीच आईला स्वयंपाकघरातील चाकूने कसे मारले ही, अवघ्या चार वर्षांच्या मुलाने दिलेली साक्ष सत्र न्यायालयाने ग्राह्य़ मानली आणि त्याच्या वडिलांना दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
रमेश मौर्य (४०) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर पत्नीच्या खुनाचा आरोप होता. तो दररोज दारू प्यायचा आणि घरी आल्यानंतर कुठल्या ना कुठल्या कारणावरून तो पत्नी मीना हिच्याशी भांडायचा. घटनेच्या दिवशी म्हणजेच ३० जून २०१३ रोजी रात्री तो नेहमीप्रमाणे मद्यपान करून घरी परतला. त्या वेळेस पत्नीने पाणी भरण्यास नकार दिला म्हणून त्याने तिला चाकूने भोसकले. त्यानंतर तो रक्तबंबाळ मीनाला रुग्णालयातही घेऊन गेला; परंतु रुग्णालयात दाखल करण्याआधीच तिचा मृत्यू झाला. रक्तबंबाळ मीनाला रुग्णालयात नेत असल्याचे तसेच तिला नेत असताना घरापासून पायऱ्यांवर सांडलेले रक्त शेजाऱ्यांनी पाहिले. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. त्यामुळे रमेशवर मीनाचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
खटल्यादरम्यान सरकारी पक्षाने एकूण सहा साक्षीदार रमेश याच्या विरोधात तपासले; परंतु रमेशच्या चार वर्षांच्या मुलाने घटनेच्या वेळी घडलेला घटनाक्रम न्यायालयासमोर कथन केला आणि त्याच आधारे अतिरिक्त न्यायाधीश संजय पाटील यांनी रमेशला पत्नीच्या खुनाप्रकरणी दोषी ठरवले व जन्मठेप सुनावली. न्यायालयात साक्षीसाठी या मुलाला उभे करण्यात आले. त्या वेळेस तो खूप घाबरलेला होता. मात्र न्यायालयाने त्याच्याशी संवाद साधत त्याला बोलते केले. न्यायालयाने सर्वप्रथम त्याला खोटे म्हणजे काय? आणि नेहमी खरेच बोलायचे असते हे माहीत आहे की नाही, अशी विचारणा त्याला केली. त्यानंतर घटनेच्या दिवशी नेमके काय घडले, याचा घटनाक्रम त्याच्याकडून जाणून घेतला. त्या वेळेस आपल्या वडिलांनी आईला स्वयंपाकघरातील चाकून मारले, असे त्याने सांगितले. त्याला जेव्हा त्याच्या वडिलांचे नाव विचारण्यात आले. त्या वेळेस त्याने ते सांगितले. मात्र वडिलांना समोर उभे करताच त्याने त्यांना ओखळण्यास नकार दिला. त्याच्या डोळ्यादेखत रमेशने त्याच्या आईसोबत काय केले हे त्याने पाहिले होते. त्यामुळे भीतीपोटी त्याने वडिलांना ओळखले नसावे, अशी माहिती अतिरिक्त सरकारी वकिलांनी सांगितले.