आर्थिक चणचण निर्माण झाल्याने मुंबईतील प्रसिद्ध अशा हयात रेजन्सी या पंचतारांकित हॉटेलने आपला कारभार काही काळासाठी स्थगित केला आहे. देशाची आर्थिक राजधानीच्या शहरात असणाऱ्या या हॉटेलने आपला सर्व कारभार तात्पुरता स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा सोमवारी रात्री केलीय. आर्थिक संकटामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं हॉटेलची मालकी असणाऱ्या कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे.

भारतामधील हॉस्पीटॅलिटी क्षेत्रातील मोक्याची जागा असणाऱ्या मुंबईमधील सर्व व्यवहार तातडीने थांबवण्यात येत असल्याचं हयार रेजन्सीने स्पष्ट केलं आहे. दिल्लीमध्ये हयात रेजन्सीचं मुख्यालय असून अनेक कंपन्यांकडे देशभरातील मुख्य शहरांमध्ये पंचारांकित हॉटेल चालवणाऱ्या कंपन्यांची मालकी आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये हॉटेल्स असली तरी दिल्ली आणि मुंबईमधील हयात रेजन्सी ही कंपनीची मुख्य हॉटेल्स असून त्यापैकीच मुंबईतील हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईथील सहारा विमानतळ मार्गावर असणारे हॉटेल सोमवार रात्रीपासून बंद करण्यात येत असलं तरी दिल्लीतील हॉटेल सुरु राहणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. करोना कालावधीतील निर्बंध, कमी झालेली पर्यटक संख्या यासाऱ्या गोष्टींमुळे कंपनीसमोर अनेक आर्थिक प्रश्न निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

यासंदर्भात हयातचे उपाध्यक्ष आणि भारतामधील प्रमुख असणाऱ्या सुजेय शर्मा यांनी अधिक माहिती दिली आहे. “मुंबईतील हयात रेजन्सीची मालकी असणाऱ्या एशियन हॉटेल्स (वेस्ट) कंपनीसमोर आर्थिक संकट निर्माण झालं आहे. हॉटेल व्यवसायामध्ये टिकून राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात मुंबई हयात रेजन्सीचा सर्व कारभार थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत हे हॉटेल बंद राहणार आहे. या हॉटेलसाठी कोणत्याही पद्धतीचं बुकींग करता येणार नाही. हयात समुहामध्ये आमचे सहकारी आणि पाहुणे हे आमची प्राथमिकता असतात. सध्याच्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी आम्ही हॉटेल मालकांसोबत चर्चा करत आहोत,” असं शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबईमधील हयात रेजन्सीचे महाव्यवस्थापक हरदिप मारवाह यांनी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हॉटेलचे मालक पगार देण्यासाठी किंवा हॉटेलचा आर्थिक कारभार चालवण्यासाठी निधी उपलब्ध करुन देत नसल्याचं सांगण्यात आल्याची माहिती दिली. याच कारणामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत हॉटेल बंद ठेवण्यात येणार असल्याचंही हरदिप यांनी स्पष्ट केलं आहे.

दिल्लीमधील हयात रेजन्सीची मालकी एशियन हॉटेल्स (नॉर्थ) या कंपनीकडे असून कंपनीने मागील अनेक महिन्यांपासून आपल्या वेबसाईटवरुन बुकींग करण्याची सेवा बंद केलीय. “दिल्लीमधील हॉटेल सुरु आहे. कोणाला बुकींग करायीच असल्यास थेट हॉटेलमध्ये फोन करुन बुकींग करता येईल किंवा थर्ड पार्टीच्या माध्यमातून बुकींग करता येईल,” असं उत्तर हयात रेजन्सी दिल्लीने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्याचं टाइम्स ऑफ इंडियाने म्हटलं आहे. त्यानंतर सहा महिने उटले असले तरी हयात रेजन्सी दिल्लीची परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याचे चित्र दिसत आहे.