मेट्रो, बुलेट मार्गाशी जोडण्याचा विचार

मुंबई-पुणे मार्गावरील देशातील पहिल्या ‘हायपरलूप’ तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाचे मुंबईतील स्थानक वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) उभारण्यात येण्याची शक्यता आहे. मेट्रो-३ च्या भुयारी मार्गिकेचे आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची स्थानके बीकेसीमध्ये आहेत. हायपरलूपचे स्थानकही येथे झाल्यास भविष्यात हा परिसर दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या शिष्टमंडळाने अमेरिका दौऱ्यादरम्यान नेवाडा येथील व्हर्जिन हायपरलूप तंत्रज्ञानाच्या चाचणी केंद्रास भेट दिली. त्यानंतर मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित हायपरलूपचे व्हिडीओ समाजमाध्यमावर टाकले. ‘व्हर्जिन हायपरलूप’ आपल्या अभियंत्यांचे पथक लवकरच पुण्याला चाचणीसाठी पाठविणार आहेत.

या प्रकल्पासाठी पुणे महानगर विकास प्राधिकरणाने (पीएमआरडी) पहिल्या टप्प्यात १५ किलोमीटरचा बालेवाडी ते गहुंजे असा प्रायोगिक मार्ग (ट्रॅक)निश्चित केला आहे. मुंबई-पुणेदरम्यानचा प्रवास अवघ्या २० ते २५ मिनिटांवर आणणाऱ्या या अतिवेगवान रेल्वे मार्गाचे मुंबईतील स्थानक ‘बीकेसी’मध्ये उभारण्यात येणार असल्याची शक्यता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (एमएमआरडीए) एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. मुंबई-अहमदाबाद या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे आणि मुंबईतील पहिल्या मेट्रो-३ या भुयारी मेट्रो मार्गिकेचे स्थानक बीकेसीमध्ये उभारण्यात येणार आहे. मेट्रो-३ च्या स्थानकाचे प्राथमिक बांधकाम या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे हायपरलूपचे स्थानक बीकेसीमध्ये झाल्यास बुलेट ट्रेन आणि मेट्रो-३ चे भुयारी मार्गिकेचे स्थानक एकमेकांना जोडण्याचा विचार असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

मात्र व्हर्जिन हायपरलूपच्या अभियंत्यांनी केलेल्या सर्वेक्षणानंतरच हा मार्ग आणि त्यामधील स्थानके निश्चित करण्यात येणार असल्याचे ‘पीएमआरडी’चे म्हणणे आहे. व्हर्जिन हायपरलूपच्या अभियंत्यांचे पथक लवकरच पुण्यात दाखल होणार असून त्यांच्याकडून प्रकल्पाचा मार्ग आणि थांबे यांबाबत सर्वेक्षण होणार असल्याचे माहिती पीएमआरडीचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली. सर्वेक्षणानंतर मार्ग आणि थाब्यांचा पर्याय आम्हाला देण्यात येणार आहे. त्यानंतर पर्यायी जागांच्या बाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहे हायपरलूप तंत्रज्ञान?

हायपरलूप तंत्रज्ञानामध्ये हवेच्या निर्वात पोकळीतून गतिरोधाशिवाय विशिष्ट वाहनातून प्रवासी किंवा सामानाची ने-आण करणे शक्य होते. यासाठी विशिष्ट प्रकारच्या टय़ूबची (बोगदा) निर्मिती करावी लागते. या टय़ूबमध्ये कॅप्सूलच्या आकाराचे डबे असतात. हे डबे टय़ूबमधील चुंबकीय तंत्रज्ञान असलेल्या रुळांवरून धावतात. टय़ूबमध्ये हवेचा प्रतिरोध नसल्याने आणि चुंबकीय तंत्रज्ञानामुळे हे डबे विमानाच्या वेगाने धावू शकतात. एका डब्यामधून २८ ते ३० प्रवासी प्रवास करू शकतात. हायपरलूप ट्रेनचा वेग हा ध्वनीच्या वेगाइतका असल्याचा दावा केला जात आहे.