मी मैदान सोडून पळणाऱ्यातला नाही असं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जात असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. जोपर्यंत महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येणार नाही तोपर्यंत मी महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार आल्याशिवाय दिल्लीवारी नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आपल्या भाषणात त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. ठाकरे सरकार हे विश्वासघातकी सरकार आहे ते फार काळ टीकणार नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवसंग्राम प्रतिष्ठानचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

आम्ही बदल्याच्या भावनेने कधीही वागलो नाही. मात्र हे सरकार प्रगती नाही तर स्थगिती सरकार आहे अशीही टीका फडणवीस यांनी केली. एवढंच नाही तर शिवस्मारकाचं काम या सरकारने जाणीवपूर्वक थांबवलं असाही आरोप फडणवीस यांनी केला. लोकशाहीची मूल्य या सरकारला मान्य नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला तर आम्हीही रस्त्यावर उतरवू आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ असा इशाराही फडणवीस यांनी दिला. एवढ्या लवकर सत्तेचा माज डोक्यात जाऊ देऊ नका असाही खोचक सल्ला फडणवीस यांनी दिला.