‘मला माझ्या घरातले राजकारण सांभाळता आले नाही’ असे म्हणत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी लतादीदींना टोला लगावला आहे. आशा भोसले मुंबईतील दीनानाथ नाट्यगृहात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी आशा भोसले यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत आशा भोसले यांना ऐ मेरे वतन के लोगो या गाण्याबाबत सुधीर गाडगीळ यांनी प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना आशा भोसले यांनी काही गोष्टी देण्यात आनंद असतो असे म्हटले आहे.

सी रामचंद्र यांच्या आत्मचरित्रात आशा भोसले यांच्याकडून ऐ मेरे वतनके लोगो या गाण्याची तालिम करून घेतल्याचा तपशील आहे. मग आयत्यावेळी लतादीदींनी हे गाणे गायले. ज्यानंतर दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. हे गाणे अजरामर झाले तेव्हापासून ते लतादीदींचे आहे की आशाताईंचे असा मुद्दा चर्चेत आहे. याबाबत तुम्ही काय सांगाल? असा प्रश्न विचारला असता काही गोष्टी देण्यात आनंद असतो घेण्यात नाही असा टोला आशा भोसले यांनी लगावला. त्यानंतर सुधीर गाडगीळ यांनी देशाच्या राजकारणाबाबत विचारले असता मला घरचेच राजकारण सांभाळता आले नाही असे म्हणत त्यांनी आपले मत व्यक्त केले.

शांता शेळके मला विचारायच्या तू सिनेमात का काम करत नाहीस तर मी त्यांना सांगायचे अहो मी रोज आरसा पाहते आणि स्वतःला सांगते की तू हे करू शकत नाही. कुठली नटी ८५ वर्षांपर्यंत काम करू शकते का? असाही प्रश्न त्यांनी विचारला. त्यांना त्यांच्या आवडीबद्दल विचारले असता मला दागिन्यांची आणि साड्यांची खूप आवड आहे असेही त्यांनी सांगितले. आशा भोसले यांनी आपल्या आयुष्यातील काही आठवणींनाही उजाळा दिला. माझ्या मुलीने स्वतःला गोळी मारून घेतली हे दुःख मी कसं सहन केलं असेल हे माझे मलाच ठाऊक आहे. मी कधीही कोणाचे वाईट केले नाही तरीही माझ्या वाट्याला खूप दुःख आले अशीही खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.