‘आदर्श’ अहवाल फेटाळण्यावरून पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीच कान उपटल्यानंतर हा अहवाल स्वीकारण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली. मात्र, असे असतानाही या प्रकरणात आपल्या हातून काहीच चुकीचे घडले नसल्याचा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी केला.
कांदिवलीत झालेल्या एका कार्यक्रमात गृहमंत्र्यांनी ‘आदर्श’बाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आदर्शमधील सदनिका वाटपात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. तसेच ती जमीनही राज्य सरकारच्या मालकीची असून त्यावर कारगिल शहिदांसाठी कोणतेही आरक्षण नव्हते, हे चौकशी अहवालातच स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे ‘आदर्श’वरून झालेल्या गदारोळानंतर प्रथमच शिंदे यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.
अशोक चव्हाण एकटे
 ‘आदर्श’ला राजकीय वरदहस्त लाभल्याचे निरीक्षण नोंदविताना चौकशी आयोगाने शिंदे यांच्यासह विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे माजी मुख्यमंत्री तसेच सुनील तटकरे व राजेश टोपे या मंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या हातून कोणतीही चूक झाली नसल्याची भावना शरद पवार यांनी बोलून दाखविली. या साऱ्या गोंधळात अशोक चव्हाण हे एकटे पडले आहेत.