रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी सध्या मुंबई आणि उपनगरांची अवस्था आहे. कल्याण डोंबिवलीत तर रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. कल्याण येथे खड्ड्यांमुळे पाच लोकांचा बळी गेला. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक अजब वक्तव्य केले. ज्या रस्त्यावर ५ लोकांचा बळी गेला त्याच रस्त्यावरून ५ लाख लोकांनी त्या दिवशी प्रवास केला. मग सगळाच दोष सरकारला कसा देता येईल? रस्त्यांची जबाबदारी ही महापालिकेचीही आहे. असे म्हणत त्यांनी खड्ड्यांची जबाबदारी शिवसेनेवर ढकलली. या वक्तव्यावरून टीका झाल्यानंतर मात्र त्यांनी आज हे वक्तव्य कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी केले नव्हते असे म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरून बराच वाद झाल्यावर या वादावर सारवासारव करत मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. मी फक्त एक उदाहरण द्यायचे म्हणून बोललो होतो. मला कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

एकीकडे खड्डे ही समस्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर भेडसावते आहे. अशात काँग्रेसने मुंबईतले खड्डे मोजण्याचे आंदोलनच हाती घेतले आहे. तर खड्ड्यांची जबाबदारी ही सगळ्यांची आहे असे रविवारी उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. यावरून राजकारण आणि आरोप प्रत्यारोप होण्यापेक्षा लवकरात लवकर हे खड्डे बुजवले कसे जातील हे पाहणे महत्त्वाचे आहे मात्र त्याकडे सत्ताधारी पक्षाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.