अभिनेते नाना पाटेकर अजूनही आपला छळ करतात आणि आपल्याला धमकावतात असा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे. नाना पाटेकर यांचा वकील असल्याचा दावा करणारी एक व्यक्ती माझ्या जवळच्या माणसांना फोन करून तनुश्री दत्ताला कोर्टात खेचण्याची धमकी देतो आहे असेही तनुश्रीने तिच्या निवेदनात म्हटले आहे. आता या सगळ्या वादात अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही आपली भूमिका मांडली आहे.

शिल्पा शेट्टी म्हणते.. 
मला ठाऊक नाही की तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यात नेमकं काय घडलं? मात्र हिंसा किंवा तणाव हे कोणत्याही समस्येचं उत्तर असू शकत नाही. महिला असो किंवा पुरुष तो ज्या ठिकाणी काम करण्यास जातो तिथे त्याला या गोष्टींचा सामना करावा लागणं गैर आहे. तनुश्री दत्ता आत्ता कोणत्या वेदनेतून जात असेल याची मला कल्पना आहे. तिच्या मनावर या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम झाला आणि होत असेल हे मी समजू शकते.

#metoo या मोहीमेबद्दल बोलताना तनुश्री दत्ताने २००८ मध्ये हॉर्न ओके प्लीज या चित्रपटादरम्यान नाना पाटेकरांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला. एवढंच नाही तर आत्ताही ते माझा छळ करत आहेत असंही तिने प्रसिद्ध केलेल्या निवदेनात म्हटलं आहे. नाना पाटेकरांनी तनुश्री दत्ताचे आरोप फेटाळून लावले आहे. चित्रीकरणाच्यावेळी सेटवर ५० जण होते. त्यामुळे तनुश्री बरोबर गैरवर्तन करण्याचा प्रश्नच येत नाही असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान या संपूर्ण वादावर नाना पाटेकर पत्रकार परिषद घेऊन तनुश्री दत्ताला उत्तर देणार आहेत. अशात आता शिल्पा शेट्टीने या वादात उडी घेत कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाबद्दल खंत व्यक्त केली आहे.