क्रीडा मानसशास्त्रज्ञ वैभव आगाशे यांचे मत

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावर नाव कोरणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिची या स्पर्धेतील वाटचाल अर्थातच सोपी नव्हती. अनेक दिग्गजांचा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारणाऱ्या सिंधूपुढे आव्हान होते ते जगातील अव्वल बॅडमिंटनपटूचे. तिथेही तिने कडवी झुंज दिली. मानसिक कणखरतेच्या बळावरच सिंधूने ही भरारी घेतली, असे मत प्रख्यात क्रीडा मानसशास्त्रज्ञ वैभव आगाशे यांनी व्यक्त केले. भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ), राष्ट्रीय नेमबाजी संघटना, भारतीय तिरंदाजी संघटना यांच्यासह विविध खेळांच्या संघटना, संस्था आणि ऑलिम्पिकपटूंबरोबर वैभव मानसशास्त्रज्ञ म्हणून काम पाहतात. सिंधूला मानसिकदृष्टय़ा कणखर करण्याच्या दृष्टीने गोपीचंद अकादमीत आयोजित विशेष सत्रात आगाशे यांनी मार्गदर्शन केले होते.

सिंधूच्या यशाचे रहस्य उलडगताना आगाशे म्हणाले, ‘सामन्यादरम्यान मजबूत स्थितीत  असताना गुण गमावल्यास सिंधूच्या मनात नकारात्मक विचार येत असे. त्यामुळे तिच्या हालचाली मंद व्हायच्या. त्यासाठी मानसिक सक्षमता सत्रादरम्यान सिंधूच्या पायांच्या हालचालींकडे लक्ष देण्यात आले. वेगवान वावरासाठी हा उपाय होता. मनाचा गोंधळ उडतो तेव्हा शारीरिक हालचालीही मंदावतात. त्यामुळे सतत धावतं राहणं तिच्यासाठी आवश्यक होतं. जेणेकरून अतिविचार करायला वेळच मिळणार नाही. सिंधूने ऑलिम्पिक स्पर्धेत सूचनांचे तंतोतंत पालन केले आणि परिणाम पदकरूपाने जगासमोर आहे.’

‘‘कोणत्याही खेळासाठी एकाग्रता महत्त्वाची असते. मात्र हातात असणाऱ्या स्मार्टफोनमुळे माणूस जगाशी जोडलेला असतो. खेळाचा सराव झाल्यावर शांतपणे त्याविषयी विचार करणे आवश्यक असते. मन मोकळे राहात नाही. आभासी जगात रमायला होते. अंतर्मुख होण्याची प्रक्रिया राबवलीच जात नाही. समाजमाध्यमांमुळे एखाद्या मुद्यावर सखोल चिंतन करता येत नाही आणि मन सातत्याने विचलित होते. बहुतांशी खेळाडूंच्या बाबतीत ही समस्या जाणवते. सामना किंवा सराव असो मन वर्तमानात राहणे अत्यावश्यक आहे. याच मुद्यावर आपण कमी पडतो असे मत आगाशे यांनी व्यक्त केले.

‘‘अवघड क्षण समोर आला, तर त्याला टक्कर देण्यासाठी मानसिक सक्षमता लागते. मात्र नक्की कोणती कौशल्ये उपयोगात आणून त्याला सामोरे जायचे याबाबत गोंधळ उडतो. समाजमाध्यमांमुळे सतत आयते पाहण्याची सवय लागते. याव्यतिरिक्त खेळाडूंवर प्रचंड सामाजिक दडपण असते. तू पदक पटकावशील या अर्थाच्या खूप साऱ्या शुभेच्छाही खेळाडूच्या मनावर दबाब आणतात. त्यामुळे कोणाशी बोलायचे आणि कोणाशी नाही, हे ठरवणेही क्रमप्राप्त झाले आहे,’’ असे परखड मत त्यांनी मांडले.

भारतीय खेळाडू कुठे कमी पडतात, याविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘‘भारतीय खेळाडूंमध्ये न्यूनगंडाची भावना जाणवते. वसाहतवादी मानसिकता आता सोडायला हवी. आपल्याकडे पुरेसे नैपुण्य आहे मात्र ही ऊर्जा योग्य दिशेने केंद्रित व्हायला हवी. विकसित देशांमध्ये योजनांबरहुकूम काम चालते. खेळांसाठी स्वतंत्र निधी आणि व्यवस्था असते. चांगले खेळाडू घडण्यासाठी प्रशिक्षकांची फौज तयार करणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. आपण या गोष्टीचा विचारच करत नाही. बाहेरच्या देशांमध्ये खेळणं आणि तंदुरुस्त राहणे, यासाठी माणसे घाम गाळतात. आपण खेळ पाहण्यात अग्रेसर आहोत. आपली लोकसंख्या प्रचंड आहे. पण खेळांमध्ये सक्रिय माणसे अत्यल्प आहेत. मोठय़ा शहरांमध्ये खेळायचे म्हटले तरी मैदानंच नाहीत. खेळाडूच्या र्सवकष विकासासाठी अकादमी प्रारुप उपयोगी आहे. पण हाताच्या बोटावर मोजता येतील एवढय़ाच अकादमी आपल्याकडे आहेत. मुळातच खेळांसाठीची पायाभूत यंत्रणा नसल्याने पदकांची अपेक्षा करणे खेळाडूंवर दडपण आणते.’’

 

खेळाडूंची मानसिकता अशी हवी..

  • क्रीडा मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घेणे म्हणजे काहीतरी दोष आहे, ही मानसिकता सोडून द्यायला हवी.
  • मानसिक तयारी हा सरावाचाच भाग आहे हे प्रशिक्षकांनी खेळाडूंच्या मनावर बिंबवायला हवे.
  • खेळाडू आपल्या विचारप्रक्रियेविषयी, अडचणींविषयी, आयुष्याविषयी खुलून बोलले तर अनेक गोष्टी सोप्या होतात.
  • भावनिक असणे वाईट नाही, मात्र व्यावसायिकतेत भावना अडसर ठरायला नको.
  • खेळाडू घडण्यासाठी शिस्त अनिवार्य आहे.
  • मनाला आणि मेंदूला वेळेची शिस्त लागली तर खेळाडूंना ते उपयुक्त ठरते. या घटकाच्या बाबतीत अनभिज्ञता जाणवते.

 

  • समाजमाध्यमांमुळे एखाद्या मुद्यावर सखोल चिंतन करता येत नाही आणि मन सातत्याने विचलित होते. बहुतांशी खेळाडूंच्या बाबतीत ही समस्या जाणवते. अंतर्मुख होण्याची प्रक्रिया राबवलीच जात नाही. सामना किंवा सराव असो मन वर्तमानात राहणे अत्यावश्यक आहे. खेळाचा सराव झाल्यावर शांतपणे त्याविषयी विचार करणे आवश्यक असते. मन मोकळे राहत नाही. आभासी जगात रमायला होते.
  • खेळाडूंवर प्रचंड सामाजिक दडपण असते. तू पदक पटकावशील या अर्थाच्या खूप साऱ्या शुभेच्छाही खेळाडूच्या मनावर दबाब आणतात. त्यामुळे कोणाशी बोलायचे आणि कोणाशी नाही, हे ठरवणेही क्रमप्राप्त झाले आहे.
  • भारतीय खेळाडूंमध्ये न्यूनगंडाची भावना जाणवते. वसाहतवादी मानसिकता आता सोडायला हवी. आपल्याकडे पुरेसे नैपुण्य आहे मात्र ही ऊर्जा योग्य दिशेने केंद्रित व्हायला हवी.
  • विकसित देशांमध्ये चांगले खेळाडू घडवण्यासाठी प्रशिक्षकांची फौज तयार करण्यावर भर दिला जातो. खेळांसाठी स्वतंत्र निधी आणि व्यवस्था असते. बाहेरच्या देशांमध्ये खेळणं आणि तंदुरुस्त राहणे, यासाठी माणसे घाम गाळतात. आपण खेळ पाहण्यात अग्रेसर आहोत. आपली लोकसंख्या प्रचंड आहे. पण खेळांमध्ये सक्रिय माणसे अत्यल्प आहेत.
  • मोठय़ा शहरांमध्ये खेळायचे म्हटले तरी मैदानंच नाहीत. खेळाडूच्या र्सवकष विकासासाठी अकादमी प्रारुप उपयोगी आहे. पण हाताच्या बोटावर मोजता येतील एवढय़ाच अकादमी आपल्याकडे आहेत. मुळातच खेळांसाठीची पायाभूत यंत्रणा नसल्याने पदकांची अपेक्षा करणे खेळाडूंवर दडपण आणते. त्यामुळे पायाभूत सुविधांवर भर द्यायला हवा.