काँग्रेस सोडल्यावर मला शिवसेनेकडून ऑफर होती असा गौप्यस्फोट स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केला. गुरुवारी रंगशारदा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हा गौप्यस्फोट केला. मी शिवसेना सोडली नाही तर मला शिवसेना सोडायला लावली. बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आले. माझ्यामुळे ठाकरे कुटुंबात वाद नको म्हणून शिवसेनेला रामराम केला. मात्र ज्यावेळी मी काँग्रेस सोडले त्यावेळी शिवसेनेने मला ऑफर दिली होती असे नारायण राणेंनी आपल्या भाषणात सांगितले.

काँग्रेसमध्ये मी १२ वर्षे होतो. या १२ वर्षांमध्ये तीन वेळा सोनिया गांधी यांनी बोलावले होते. तसेच अहमद पटेल यांनी सहा महिन्यात तुम्हाला मुख्यमंत्री करतो असे आश्वासनही दिले होते. मात्र ऐनवेळी मला डावलून अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्यात आले. ज्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यामुळे काँग्रेसची सत्ता गेली अशा पक्षात मी कशाला रहायचे? असा टोलाही त्यांनी अशोक चव्हाण यांना लगावला.

नारायण राणे उतावळे आहेत, बंड करतात मग शांत होतात. यावर अनेकदा चर्चा होते. प्रसारमाध्यमांतून टीका केली जाते. मात्र मी कोणताही निर्णय घेताना घाई करत नाही हे मला तुम्हाला सांगायचे आहे. याही भाषणात त्यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेचे मंत्री नुसतेच म्हणतात की आम्ही राजीनामा देऊ, सत्तेतून बाहेर पडू.. पण कधी बाहेर पडणार कधी राजीनामा देणार ते काही सांगत नाही. सत्तेत राहून सगळी जबाबदारी भाजपाच घेत आहे मग शिवसेनेने काय फक्त खायचे काम करायचे आहे का? असाही प्रश्न नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला.