दिल्लीपासून गल्लीपर्यंत सध्या देशात चर्चा आहे ती करोना नियंत्रणाच्या मुंबई मॉडेलची. या मॉडेलचे सुत्रधार आहेत मुंबई महानगरपलिका आयुक्त इक्बाल सिंग चहल. इक्बालसिंग यांनी नुकतीच इंडियन एक्सप्रेसला मुंबईमधील करोना नियंत्रण मॉडेलसंदर्भात सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मुंबईने ऑक्सिजनचा तुटवडा हा प्रश्न कायमचा कसा सोडवला आणि शहरातील करोनाबाधितांची संख्या कशी नियंत्रणामध्ये आणली यासंदर्भातील सविस्तर माहिती दिलीय. विशेष म्हणजे या मुलाखतीमध्ये इक्बाल सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक करताना, उद्धव ठाकरेंसारखी व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून लाभले हे माझं भाग्य असल्याचं म्हटलं आहे.

मुलाखतीमध्ये इक्बाल सिंग यांना मुंबईप्रमाणेच इतर ठिकाणीही करोनाचा प्रश्न दिवसोंदिवस गंभीर होत चालला आहे. असं असतानाच कोणी कोणती जबाबदारी घ्यावी हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. ही जबाबदारी म्हणजे केवळ राजकीय जबाबदारी नाही तर प्रशासकीय स्तरावरील जबाबदारी वाटू घेताना अनेक ठिकाणी अडचणी येत असल्याचं तुम्हाला वाटतं का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना इक्बाल सिंग यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला.

“अनेक गोष्टींसाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो. पहिली गोष्ट म्हणजे मला असे मुख्यमंत्री मिळाले ज्यांनी मला निर्णय घेण्यासंदर्भातील स्वातंत्र्य दिलं होतं. त्यामुळे मी आवश्यक निर्णय तातडीने घेऊ शकतो. हे स्वातंत्र्य इतर अनेक शहरांमध्ये काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना नाहीय. दुसरी गोष्ट म्हणजे मी मागील मे महिन्यामध्ये मुंबई माहनगरपालिकेमध्ये रुजू झालो. त्यावेळी मी माझ्या अंतर्गत काम करणाऱ्या टीमला हा विषाणू काही लवकर आपला निरोप घेणार नाहीय असं स्पष्ट केलं होतं. आपल्याला एका मोठ्या लढाईसाठी तयारी करणं गरजेचं आहे असं सांगत, ही तयारी कदाचित एक, दोन किंवा तीन वर्षांसाठी असेल. तेव्हापासूनच आम्ही यंत्रणा उभारण्यास सुरुवात केली. आता या सर्व यंत्रणा जवळजवळ ऑटोपायलेट मोडवर काम करतात. आज दिवसाला दोन हजार, पाच हजार किंवा १० हजार रुग्ण शहरात आढळून आले तरी यंत्रणांवर ताण येत नाही. हा यंत्रणा नियोजित पद्धतीने अगदी बरोबर काम करतात. मला कोणाचाही कशासाठीही फोन येत नाही,” असं उत्तर इक्बाल सिंग यांनी दिलं.

“लॅबकडून थेट रुग्णाला करोना अहवाल देण्यावर बंदी घालणारं मुंबई हे देशातील पहिलं शहर होतं. ते लोकं सात वाजता करोना चाचणीचे अहवाल रुग्णांना द्यायचे आणि त्यानंतर एकच गोंधळ उडायचा आणि बेड्ससाठी धावपळ व्हायची. एका हेल्पलाइनवर काही वेळात हजारो कॉल यायचे. त्यामुळे केंद्रीय नियंत्रण कक्षाचा कारभार कोलमडून पडायचा. आम्ही यंत्रणा उभारल्यावर हे थांबलं. यंत्रणा काम करु लागल्यानंतर रुग्णांबरोबरच नातेवाईकही उगाच रुग्णालयामध्ये धापवळ करायचे थांबले आणि यामुळे विषाणूचा प्रसारही थांबला. नाहीतर आधीच्या गोंधळामध्ये एका करोनाबाधित व्यक्तीला बेड शोधण्याच्या प्रक्रियेत जवळजवळ २०० जणांना करोनाचा संसर्ग होण्याची भीती असायची,” असं इक्बाल सिंग यांनी सांगितलं.