केंद्रीय राज्यमंत्री राजीव शुक्ला यांना देण्यात आलेल्या भूखंडाशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केले आहे. तसेच या विषयाची कागदपत्रे किरीट सोमय्या यांनी कशी मिळविली याची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
 राजीव शुक्ला भूखंड प्रकरण उजेडात आणणारा कोकणचा हापूस कोण या मथळ्यात मंगळवारी  ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात राणे यांनी महसूल विभागाशी संबधित फाइल सोमय्या यांनी कायदेशीर मार्ग अवलंबिता मिळविल्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.  या विषयाशी आपला काहीही संबंध नसून आपल्या माहितीप्रमाणे सोमय्या यांनी असे वक्तव्यही केलेले नाही. असे असताना केवळ आपली बदनामी करण्यासाठी बातमीमध्ये आपल्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याचा दावाही राणे यांनी या पत्रात केला आहे.
 तसेच सोमय्या यांनी कायदेशीर मार्ग बाजूला ठेवून या प्रकरणाची नस्ती मिळविल्याचे मान्य केले असून ‘ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट’ मधील तरतुदीनुसार या प्रकरणी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

हरयाणाही पादाक्रांत करण्याची तयारी
‘आम आदमी पक्षा’ने आता हरयाणावर लक्ष केंद्रित केले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचा मानस या पक्षाने व्यक्त केला आहे. ‘‘दिल्ली विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. ९० सदस्य असलेल्या हरयाणा विधानसभा निवडणुकीतही पक्षाकडून चांगली कामगिरी केली जाईल,’’ असा विश्वास हरयाणामधील ‘आम आदमी पक्षा’चे प्रवक्ते राजीव गोदरा यांनी व्यक्त केला. हरयाणामधील जमीन घोटाळे, भ्रष्टाचार आणि वैद्यकीय व शैक्षणिक सुविधांची वानवा हे मुद्दे आम्ही निवडणुकीत मांडणार आहोत, असे गोदरा यांनी सांगितले. हरयाणामधील लोकसभेच्या १० जागा ‘आप’कडून लढवल्या जाणार आहेत, याबाबत विचारले असता, याचा निर्णय पक्षाचे केंद्रीय पातळीवरील नेते घेतील, असे गोदरा म्हणाले. सध्या हरयाणामध्ये काँग्रेसचे सरकार असून, राष्ट्रीय लोकदल, हरयाणा जनहित काँग्रेस आणि भाजप या पक्षांशी ‘आप’ला लढत द्यावी लागेल.