पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीबद्दल केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी शनिवारी महत्वपूर्ण खुलासा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मनमानी पद्धतीने कारभार करतात हा आरोप गडकरींनी खोडून काढला तसेच भाजपा हा एकखांबी तंबू (वन मॅन शो) पक्ष नाही, असेही गडकरींनी स्पष्ट केले. ते इंडिया टुडेच्या कार्यक्रमात बोलत होते.

तुम्ही मोदींवर अन्याय करताय. नरेंद्र मोदी दिवसाचे १८ तास काम करतात. मोदी स्वयंकर्तुत्वाने नेतेपदापर्यंत पोहोचले आहेत. नरेंद्र मोदी सर्व मंत्रालयांकडून प्रेझेंटेशन घेतात त्यानंतर त्यांना वाटणारे बदल ते सुचवतात असे गडकरी म्हणाले. मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या गडकरींकडे रस्ते वाहतूक, महामार्ग, जहाज बांधणी, जलसिंचन, नदी विकास ही खाती आहेत. मोदींच्या अनेक निर्णयावर मी स्वत: असहमती प्रगट केली आहे, असे यावेळी गडकरींनी सांगितले.

एखादी बाब चांगली नाही, ती अशी करु नका असे आपण मोदींना सांगतो. एकदा शेतकऱ्यांसंबंधीचा निर्णय मला पटला नव्हता. शेतकरी या निर्णयावर खूष होणार नाहीत असे मी मोदींना सांगितले. त्यावर त्यांनी लगेच कृषी मंत्री, अन्य मंत्री आणि प्रधान सचिवांना माझ्यासोबत बसून माझे काय म्हणणे आहे ते ऐकून घ्यायला सांगितले, असे गडकरींनी सांगितले.

गडकरी म्हणाले, भाजपा हा ‘वन मॅन पार्टी’ असल्याची धारणा बनत चाललीय या प्रश्नावर गडकरी म्हणाले, भाजपा हा एकखांबी तंबू असलेला पक्ष नाही. हा वडिल-मुलगा किंवा आई-मुलाचा पक्ष नाही. भाजपा हा लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे. भाजपा अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, नितीन गडकरी, अमित शहा किंवा नरेंद्र मोदींचा पक्ष नाही. ज्या लाखो कार्यकर्त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पक्षासाठी दिले त्यांचा हा पक्ष आहे.

मात्र, तरीही पंतप्रधान मोदींबद्दल एक विशिष्ट अशी धारणा बनली आहे आणि ते आमचे दुर्देव आहे, असे गडकरी म्हणाले. मोदींबाबतचा हा समज चुकीचा असून ते पूर्णपणे लोकशाहीवादी विचारांचे आहेत असे गडकरी म्हणाले.