गेल्या दहा वर्षांमध्ये आपण खूप काही शिकलो आहोत. भारत हा सहिष्णू देश आहे, तर महाराष्ट्र हे सहिष्णू राज्य आहे. भारताने कधीही स्वतःहून कोणत्याही देशावर हल्ला केला नाही. मुंबईत जे दहा वर्षांपूर्वी घडले ते दुर्दैवीच होते. मात्र या त्या घटनेला आपण धीराने तोंड दिले. या वाईट अनुभवांतूनही आपण शिकलोच आहोत. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यानंतर असा हल्ला कधीही होऊ द्यायचा नाही असा दृढनिश्चय आपण सगळ्यांनी केला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

२६/११ चा हल्ला हा भारतावरचा सर्वात मोठा हल्ला होता असे मानले गेले. या हल्ल्यानंतर जगभरात असे दुर्दैवी आणि भ्याड हल्ले झाले. त्यानंतर हा हल्ला फक्त देशावरचाच मोठा हल्ला नाही तर माणुसकीवरचा हल्ला होता हे जगाने मान्य केले आहे. तसेच अशा प्रकारची विकृत मानसिकता कधीही मान्य केली जाणार नाही त्यामुळेच दहशतवादाविरोधात आपण एकसंधपणे उभं राहिलं पाहिजे असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.  माणुसकीपेक्षा मोठे काहीही नाही असंही ते म्हणाले.

२६/११ सारखा हल्ला पुन्हा होऊ नये म्हणून मुंबई पोलीस, तटरक्षक दल, कोस्ट गार्ड हे ज्याप्रकारे काळजी घेत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच ज्यांनी दहा वर्षांपूर्वी असा हल्ला झाल्यानंतर आपल्या सगळ्यांचं रक्षण केलं त्या पोलिसांचे, लष्कराचे, एनएसजी कमांडोंचे ऋण कधीही फेडता येणार नाही अशा भावनाही फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केल्या.

इंडियन एक्स्प्रेस समुहाच्या वतीने मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी २६/११ च्या दशकपुर्तीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ज्यामध्ये मांडलेल्या मनोगतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवादाशी लढा देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकसंध राहिलं पाहिजे असं मत व्यक्त केलं. तसंच याप्रकरचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल इंडियन एक्स्प्रेस समुहाचं कौतुकही त्यांनी केलं. २६/११ च्या हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबीयांसोबत १२५ कोटी भारतीय आहेत तुम्ही कधीही स्वतःला एकटं समजू नका असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.