विरोध अजानला नव्हे, ध्वनिक्षेपकाला गायक सोनू निगमचे प्रत्युत्तर; वक्तव्याचा विपर्यास केल्याबद्दल नाराजी

ध्वनिक्षेपकावरून होणाऱ्या अजानविरोधात ट्विट केल्यानंतर टीकेचे लक्ष्य ठरलेला गायक सोनू निगमने टीकाकारांना नेटाने उत्तर दिले होते. मात्र, चहुबाजूंनी होणारी टीका आणि मौलवीच्या धमक्यांमुळे सोनू निगमने बुधवारी पत्रकार परिषद घेतली आणि टीकाकारांना प्रत्युत्तद दिले. ”मी कोणाच्याही धार्मिक भावना दुखावलेल्या नाहीत. माझा विरोध अजानला नव्हे, ध्वनिक्षेपकाला आहे”, असे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाला, अशी सारवासारवही त्याने केली. मात्र, त्याचवेळी मौलवींनी दिलेल्या धमकीचा निषेध करत त्याने भर पत्रकार परिषदेत मुंडनही करवून घेतले.

ध्वनिक्षेपकावरून होणाऱ्या अजानविरोधात सोनू निगमने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर त्याच्या बाजूने आणि त्याच्या विरोधात अशा दोन्ही प्रतिक्रि या उमटल्या. त्यातील प्रतिक्रियांना सोनूने दोन दिवस उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही टीकेचा ओघ थांबत नव्हता. त्यातच कोलकात्यातील मौलवीने सोनू निगमचे मुंडन करणाऱ्यास १० लाख रुपयाचे इनामही जाहीर केले. या पाश्र्वभूमीवर सोनू निगमने आपले मत माध्यमांसमोर मांडले. या पत्रकार परिषदेला सोनूने खास सेलिब्रिटी के शभूषाकार आलिम हाकिमलाही बोलवून घेतले होते. ज्या मौलवींनी सोनू निगमचे मुंडन करून आणा.. असा फतवा काढला होता त्यांना उत्तर म्हणून आपण टक्कल करून घेणार असल्याचे सोनूने आधीच जाहीर केले. मात्र, केस कापून घेण्यापूर्वी त्याने आपले ट्विट हे कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हते, हे पुन्हा स्पष्ट केले. ध्वनिक्षेपक कोणत्याही धर्माचा भाग नाही. त्यामुळे ध्वनिक्षेपकाची गरज नाही, असा पुनरूच्चार त्याने केला. ”ध्वनिक्षेपकावरून होणारी अजान ही गुंडागर्दी आहे, असे मी म्हटले. माझ्या या एकाच विधानाला उचलून धरले गेले. मात्र मी केवळ मशिदींबद्दल बोललो नाही. मंदिरे आणि गुरूद्वारांचाही उल्लेख माझ्या ट्विटमध्ये केला होता. त्याकडे मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले” असा आरोप त्याने यावेळी केला. माझे गुरू उस्ताद गुलाम मुस्तफा खान हे आहेत. शिवाय, मोहम्मद रफी यांना मी पित्यासमान मानतो. तरीही मी मुस्लिमविरोधी आहे, अशी लोकांची समजूत असेल तर ती त्यांची समस्या आहे माझी नाही, असे सांगत या एकूणच गदारोळाबद्दल त्याने संतापही व्यक्त केला.

सध्याच्या राजकीय-सामाजिक वातावरणावरही त्याने शेरेबाजी केली. ‘लोक सध्या एकतर डाव्या विचारसरणीचे असू शकतात नाहीतर उजव्या.. निधर्मी व्यक्ती ही अल्पसंख्यांक म्हणून गणली जाते’, अशी थेट टीका करताना आपण स्वत: निधर्मी, तटस्थ विचारांची व्यक्ती आहोत आणि तटस्थपणे विचार करणाऱ्या व्यक्ती सध्या दुर्मिळ असल्याने मी इथे अल्पसंख्यांक ठरलो आहे, असे त्याने स्पष्ट केले.

आपल्याविरोधात फतवा काढणाऱ्या मौलवींना प्रेमाच्या भाषेत उत्तर देणार असल्याचे सांगत त्याने आलिम हाकिमकडून केस कापून घेतले. माझे केस कापणारा मुसलमान  आणि मी हिंदू आहे, तरी काही फरक पडत नाही, असा टोलाही लगावायला तो विसरला नाही.

नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार

सोनू निगम याच्या वक्तव्यानंतर मुंबईत कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र नागपाडा पोलीस ठाण्यात वक्तव्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिली.