शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्याचा आपला इरादा पुन्हा एकदा जाहीरपणे बोलून दाखवला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेची एकहाती सत्ता आणणे, हे माझे स्वप्नच नाही तर जिद्द आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. अमित शहा स्वबळावर सरकार आणण्याचे स्वप्न पाहात असतील तर शिवरायांच्या, शिवसेनाप्रमुखांच्या महाराष्ट्रात शिवसेनेची ‘शिवशाही’ आणण्याचे स्वप्न का नसावे, असा सवाल उद्धव यांनी ‘सामना’ वृत्तपत्रातील मुलाखतीत उपस्थित केला. या मुलाखतीत उद्धव यांनी स्वबळाची भाषा करणाऱ्या शहांना अप्रत्यक्षपणे टोला हाणला. जर का कोणास एकहाती सरकार पाहिजे असेल तर तो अपराध किंवा गुन्हा आहे असे मला वाटत नाही. पण कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांना स्वबळाचे सरकार आणायचे असेल तर त्यांना कोणी अडवू शकत नाही. कश्मीरमध्ये ते आता मुफ्तीबरोबर आहेत, पण उद्या तिकडे जाऊन ते स्वबळाची भाषा करू शकतात. त्यांना कोण अडवणार? किंबहुना अगदी अरुणाचल वगैरे जे काही प्रदेश आहेत. मणिपूर, अरुणाचल वगैरे तिकडेसुद्धा चीनने अर्धाअधिक भाग व्यापलेला आहे. तिकडेसुद्धा ते स्वबळावर सरकार आणू शकतील ना. तेवढी धमक त्यांच्यात आहे, असे उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत म्हटले आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत दोन्ही पक्षांतील दरी अधिकच रूंदावण्याची शक्यता आहे.