मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज अभिनेता अजय देवगणसोबत तान्हाजी हा सिनेमा पाहणार असल्याचं वृत्त होतं. मात्र त्यांनी हा सिनेमा सिनेमागृहात जाऊनही पाहिला नाही. प्लाझा या सिनेमागृहात तान्हाजी या सिनेमाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. हा खास शो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अजय देवगणसोबत पाहतील असंही वृत्त आलं होतं. मात्र प्लाझामध्ये जाऊनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा सिनेमा पाहिला नाही.

काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
तान्हाजी-द अनसंग वॉरियर हा सिनेमा मी पाहणार असल्याच्या बातम्या आल्या. मात्र आज मी चित्रपट पाहणार नाही. मंत्रिमंडळासोबत मी हा चित्रपट नक्की बघेन असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाईल्ड मुंबई या शहरातील नैसर्गिक वारसा आणि त्याचे महत्त्व सांगणाऱ्या चित्रफितीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुंबई महापालिकेच्या या उपक्रमाचे कौतुकही केलं. वेळ घ्या मात्र मुंबईचं वैभव जगभरात पोहचवा अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिलं.

तान्हाजी या सिनेमात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, अजिंक्य देव आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. कोंढाणा हा किल्ला जिंकण्याची जबाबदारी तान्हाजी मालुसरे यांनी घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांना तान्हाजी मालुसरे हे मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना या मोहिमेबाबत समजलं असता आधी लगीन कोंढण्याचे मगच माझ्या रायबाचे असे म्हणून तान्हाजी मालुसरे कोंढाण्याच्या मोहिमेवर गेले. हा किल्ला जिंकताना त्यांना वीरमरण आलं. गड आला पण माझा सिंह गेला असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजही हळहळले. तान्हाजी मालुसरे यांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंह असा केला म्हणूनच कोंढण्याला नाव पडले ते सिंहगड.

हा सिनेमा गेल्या दहा दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतो आहे. अशात हा सिनेमा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अजय देवगणसोबत हा सिनेमा पाहणार  असल्याचं वृत्त होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी चित्रपटगृहात जाऊनही हा सिनेमा पाहिला नाही. हा सिनेमा मंत्रिमंडळासोबत पाहणार असल्याचं सांगत त्यांनी हा सिनेमा पाहिला नाही.