केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून ‘लकव्या’चा वार केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचा प्रतिवार झेलण्याची वेळ त्यांच्यावर आल्याने, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील शीतयुद्धाला आता तोंड फुटले आहे.
नियमानुसार होणारी कामे ही खात्यांतर्गत होतात. नियमबाह्य किंवा सवलती आवश्यक असणाऱ्या फायली मुख्यमंत्री कार्यालयात येतात. सर्वसामान्यांच्या हिताच्या कामांना प्राधान्य देण्यावर आपला भर आहे. नियमबाह्य कामे सहजासहजी होत नाहीत, ती विचारपूर्वकच करावी लागतात, असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासनाला लकवा लागल्याची टीका करणारे पवार यांना बुधवारी पत्रकार परिषदेत चांगलेच ठणकावले. शरद पवार यांच्या आरोपांना योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी उत्तर देईन, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. दुष्काळ, पाणीटंचाई, गिरणी कामगारांची घरे, नागपूरमधील मिहान प्रकल्प, विदर्भातील नझूल जमीन याबाबतच्या निर्णयांना आपले प्राधान्य असून यातील काही प्रश्न तर वर्षांनुवर्षे रखडले होते, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. वैयक्तिक आणि सार्वजनिक कामांमध्ये आपण नेहमीच फरक करतो, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी पवार यांना उद्देशून हाणला. कोणी कितीही आरोप केले तरीही आम आदमीला प्राधान्य देण्यावर म्हणजेच सार्वजनिक कामांवरच आपला भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.     
पवारांचा वार: सही करताना लोकांचा हात लकवा लागल्याप्रमाणे थरथरतो!