14 November 2019

News Flash

राज्यपालांच्या सांगण्यावरून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करणार – फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि आपला राजीनामा त्यांच्याकडे सोपवला, तसेच चर्चाही केली.

संग्रहीत

अनेक प्रयत्न केल्यानंतरही शिवसेना-भाजपामध्ये सत्ता स्थापनेबाबत एकमत होऊ न शकल्याने हा तिढा आणखीनच बिकट बनला आहे. यापार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि आपला राजीनामा त्यांच्याकडे सोपवला तसेच सत्तास्थापनेच्या स्थितीबाबत चर्चाही केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले की, राज्यपालांच्या सांगण्यावरून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून मी यापुढे काम करणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर अनेक प्रकारे टीकास्त्र सोडलं. अडीच-अडीच वर्षे हा फॉर्म्युला ठरलेलाच नाही, हे मी आजही सांगतो आहे. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर आमची बोलणी फिस्कटली होती त्यानंतरच्या माझ्यासमोरच्या एकाही चर्चेत हा विषय झाला नाही. उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात जर विषय झालेला असेल तर मला माहित नव्हतं. मी तसं अमित शाह आणि नितीन गडकरी यांना विचारलं मात्र त्यांनीही असं काहीही ठरलेलं नाही असं सांगितलं. या संदर्भातले समज-गैरसमज चर्चेने सोडवता आले असते असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

तसेच शिवसेनेकडून दररोज पक्षाची भूमिका मांडणारे खासदार संजय राऊत यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहयाद्री अतिथिगृहावरील पत्रकार परिषदेत चांगलाच समाचार घेतला. त्यांनी नाव न घेता राऊतांवर टीका केली. शिवसेनेकडून दररोज बोलणाऱ्या काही नेत्यांनी दरी वाढवण्याचं काम केलं. बोलण्यामुळे त्यांना मीडिया स्पेस नक्की मिळते पण अशा बोलण्याने सरकार बनत नाही.

First Published on November 8, 2019 5:18 pm

Web Title: i will work as caretaker cm as advice from governor says fadnavis aau 85