ध्वनिफीत तयार करणाराच अडकला; दहा कोटींसाठी धमकी

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून राधेशाम मोपलवार यांची हकालपट्टी करण्यास कारणीभूत ठरलेली ध्वनिफीत तयार करणाऱ्याला मोपलवार यांच्याकडूनच खंडणीची मागणी केल्याबद्दल ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली.

सतीश सखाराम मांगले आणि त्याची दुसरी पत्नी श्रद्धा मांगले असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहते. मोपलवार आणि त्यांच्या पत्नीची घटस्फोट घेण्याची प्रक्रिया  सुरु होती. त्यावेळेस पत्नीची माहिती मिळविण्यासाठी मोपलवार यांनी खासगी गुप्तहेर म्हणून सतीषला नेमले होते. तेव्हापासून या दोघांची ओळख झाली. त्याचाच फायदा घेऊन त्याने मोपलवार यांची एक ध्वनीफिती बनवून ती वृत्तवाहिन्यांना पुरविली. त्यात  करून तयार केल्याचा मोपलवार यांचा आरोप असून त्यासंबंधी शासनस्तरावर  चौकशी सुरू आहे. हे ध्वनीफितीचे प्रकरण मागे घेण्यासाठी सतीश हा गेल्या काही दिवसांपासून दहा कोटी रुपयांची खंडणी मागून मोपलवार यांना धमकावित होता, अशी माहिती ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.

२३ ऑक्टोबर रोजी सतीश मांगले, त्याची पत्नी श्रद्घा, मित्र अनिल वेदमेहता या तिघांनी क्लिंग मिश्रा याच्यामार्फत मोपलवारांशी संपर्क साधला होता. त्यांच्याकडे दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर पुन्हा त्याने तडजोडअंती सात कोटी रुपयांची मागणी केली. तसेच याप्रकरणी पोलिसात तक्रार केली तर मोपलवार आणि त्यांच्या मुलीला गुन्हेगारी टोळीमार्फत मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात मोपलवार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सतीश आणि त्याची पत्नी श्रद्धा या दोघांन अटक केली.

खंडणी, बलात्काराचा गुन्हा

सतीष याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असून तो खासगी गुप्तहेर म्हणून काम करतो. त्यामुळे त्याला वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांसोबत ओळख वाढवून त्यांचे मोबाईलवरील संभाषण रेकॉर्ड करण्याची सवय होती. पाच वर्षांपुर्वी त्याने काही उद्योजकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या मोबाईल कॉलची माहिती काढली होती. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्याविरोधात खंडणीचाही तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.

मोपलवार यांचा मार्ग मोकळा ?

मोपलवार यांच्या ध्वनिफितीवरून काँग्रेस व राष्ट्रवादीने विधिमंडळात केलेल्या आरोपांनंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. ठाणे पोलिसांच्या कारवाईनंतर मोपलवार कसे निर्दोष आहेत याची संदेशबाजी सुरू झाली. प्रसिद्धी करणाऱ्या एका कंपनीने तर तसे मेलही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना पाठविले. मोपलवार हे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांपैकी मानले जात असले तरी त्यांची नियुक्ती करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना विचार करावा लागणार आहे. कारण आरोप असलेल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात, असा आरोप होऊ शकतो. मोपलवार यांना वाचविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलल्याची मंत्रालयात चर्चा आहे.