मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदी आपली वर्णी लागावी यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील तब्बल डझनभर अधिकाऱ्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया आणि ऊर्जा निर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी तसेच केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले आर. ए. राजीव या पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मात्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या आशिर्वादासाठी इच्छुक अधिकाऱ्यांच्या दिल्लीवाऱ्या सुरू झाल्या आहेत.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीची जमीन मोठय़ा प्रमाणात आहे. तिचा विकास करण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर या पोर्टचे आधुनिकीकरणही करण्यात येणार आहे. त्यामुळे हे अध्यक्षपद महत्वाचे मानले जात आहे. त्यातच राज्य सरकारच्या सेवेत सध्या कोंडी होत असल्याने अनेक सनदी अधिकारी अस्वस्थ आहेत. याउलट मुंबई पोर्टमध्ये केवळ केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा एकछत्री अंमल असल्याने आणि त्यांच्यासोबत काम करणे फारसे त्रासाचे नसल्याने राज्यातील अनेक अधिकारी तेथे जाण्यास आकांक्षा बाळगून आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव विजय सतबीर सिंह, सिडकोचे उपाध्यक्ष संजय भाटिया, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बीपीन श्रीमाळी, केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले आर. ए. राजीव, राजमाता जिजाऊ महिला आणि बालकल्याण मिशनच्या महासंचालिका वंदना कृष्णा, आदिवासी विकास विभागाचे सचिव राजगोपाल देवरा, परिवहन आयुक्त सोनिया सेठी आदी अधिकाऱ्यांनी या पदसाठी अर्ज केले असून लवकरच त्यांच्या मुलाखती होणार आहेत. मात्र त्यापूर्वी गडकरी यांचा विश्वास संपादन करण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत आपले नाव पोहोचविण्यासाठी या अधिकाऱ्यांचे विविध मार्गानी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काही अधिकाऱ्यांनी दिल्लीवाऱ्याही केल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
दबावामुळे बदली
एका अधिकाऱ्याने या पदावर आपली वर्णी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. केंद्रातील मंत्र्यांच्या माध्यमातून कार्मिक मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर दबावही आणला. मात्र कार्मिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दबावास दाद न देता या प्रयत्नशील अधिकाऱ्याची थेट दुसरीकडेच बदली केल्याची माहितीही सूत्रांनी दिली.