नयन गोयल, अजय अगरवाल आणि ठाण्याचा उमंग गुप्ता यांची मोहोर

मुंबई : सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला असून नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत भोपाळ येथील नयन गोयल, तर जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत राजस्थान येथील अजय अगरवाल यांनी देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ठाण्याच्या उमंग गुप्ता याने जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत देशात तिसरे स्थान मिळवले आहे.

त्याचबरोबर फाऊंडेशनचाही निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत पुण्यातील रजत राठी याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया’च्या वतीने मे आणि जूनमध्ये जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमानुसार ही सीए अंतिम परीक्षा आणि फाऊंडेशन परीक्षा घेण्यात आली होती. नव्या अभ्यासक्रमानुसार ३ हजार ३६९ तर जुन्या अभ्यासक्रमानुसार १० हजार ८१६ विद्यार्थ्यांना सनद देण्यात येणार आहे.  नव्या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत भोपाळ येथील नयन गोयल हा ८०० पैकी ६०७ गुण मिळवून देशात प्रथम आला. बंगळूरु येथील काव्या एस. ही (६०४ गुण) दुसरी, तर जयपूर येथील अर्पित चित्तोरा (६०० गुण) तिसरा आला आहे. जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत राजस्थान येथील अजय अगरवाल (६५० गुण) प्रथम आला. हैदराबाद येथील राधालक्ष्मी व्ही. पी. (६३३ गुण) दुसरी, तर ठाण्याचा उमंग गुप्ता (५८८ गुण) तिसरा आला आहे. फाऊंडेशन परीक्षेत पुण्यातील रजत राठी (४०० पैकी ३५० गुण) हा प्रथम, तर आंध्र प्रदेश येथील कलिवारप्पू साई श्रीकर (३४४ गुण) हा दुसरा आला. भोपाळ येथील प्रियांशी साबू आणि सुरत येथील मीनल अगरवाल (३४३ गुण) यांनी तिसरे स्थान पटकावले आहे.

दृष्टिक्षेपात निकाल

नव्या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेसाठी पहिल्या विषय गटाच्या (ग्रुप १) परीक्षेला ८ हजार ८९४ विद्यार्थी बसले होते, त्यातील १५०० विद्यार्थी (१६.८७ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. दुसऱ्या विषय गटाच्या (ग्रुप २) परीक्षेला ६ हजार ५२९ विद्यार्थी बसले असून त्यातील ११४६ विद्यार्थी (१७.५५ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. दोन्ही विषय गटांची परीक्षा ११ हजार ९२ विद्यार्थ्यांनी दिली असून त्यातील २ हजार ३१३ (२०.८५ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जुन्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या विषय गटाच्या (ग्रुप १) परीक्षेसाठी २५ हजार ५२ विद्यार्थी बसले होते, त्यातील ४ हजार ६१० विद्यार्थी (१८.४० टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. दुसऱ्या विषय गटाची (ग्रुप २) परीक्षा ३६ हजार ९४५ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यातील ८ हजार ७६२ विद्यार्थी (२३.७२ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. दोन्ही विषय गटांची परीक्षा १५ हजार ५६० विद्यार्थ्यांनी दिली असून त्यातील १ हजार १८७ (७.६३ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. फाऊंडेशन परीक्षा ३० हजार ९७१ विद्यार्थ्यांनी दिली होती. ५ हजार ७५३विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

आईवडील सनदी लेखापाल असल्यामुळे माझीदेखील सनदी लेखापाल होण्याची इच्छा होती. या परीक्षेत देशातून तिसरा आणि महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटकावल्याने खूप अभिमान वाटत आहे. पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरीत्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे श्रेय मी माझ्या बहिणीला देईन. माझी बहीणदेखील गेल्या वर्षी सनदी लेखापाल झाली आहे. तिच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेची तयारी केली. आता एमबीए करणार आहे.

  – उमंग गुप्ता, ठाणे</strong>