मासे, भाजी, दूध साठवण्याचा बर्फाचा खाण्यासाठी वापर; पाणीटंचाईचाही परिणाम
उन्हात फिरून घामाघूम झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभे राहून बर्फाचा गोळा किंवा उसाचा रस प्यायचा विचार आला तर सावधान! कारण तुमच्या कोरडय़ा घशाला गारेगार आल्हाद देणारा बर्फ हा खाण्याचा असेलच असे नाही. मुंबईत सध्या रसात, गोळ्याकरिता वापरला जाणारा बहुतांश बर्फ हा खाण्यासाठीचा नसून मासे, भाजी, दूध आदी नाशिवंत वस्तू साठवण्यासाठीचा आहे. त्यातही यंदा पाण्याच्या टंचाईमुळे विहिरी, कूपनलिका अशा मिळेल त्या मार्गाने मिळणारे पाणी मिळवून कारखान्यांमध्ये बर्फ तयार केला जातो आहे. पालिकेला बर्फाच्या ९२ टक्के नमुन्यांमध्ये इ कोलाय हे घातक जीवाणू सापडण्याचे कारणही हेच आहे. याहून गंभीर म्हणजे साठवणुकीच्या बर्फाचे कारखाने अन्न व औषध प्रशासनाच्या अखत्यारित येत नसल्याने या प्रकरणी कारवाईचीही शक्यता नाही.
अवघ्या मुंबईत खाण्यासाठी बर्फ बनविणारा एकमेव कारखाना असून शहरात वापरला जाणारा ९९ टक्के बर्फ हा ठाणे, नवी मुंबई परिसरातील साठवणुकीचा बर्फ तयार करणाऱ्या कारखान्यांमधून येतो आहे. मे महिन्यात पालिकेने शहरातील विविध दुकानांमधील बर्फाची पाहणी केली असता त्यातील तब्बल ९२ टक्के नमुन्यांमध्ये इ कोलाय हे जीवाणू आढळले. पाण्याच्या २६ टक्के नमुन्यांमध्येही हे जीवाणू सापडले. बर्फामधील इ कोलायचे प्रमाण एवढे प्रचंड असल्याचे कारण शोधले असता अत्यंत भयंकर वास्तव दिसून आले आहे.
मुंबईत बॅलार्ड इस्टेट येथे अंबिको ही एकमेव खाण्यायोग्य बर्फ बनवणारी आइस फॅक्टरी आहे. खाण्यायोग्य बर्फाची किंमत ही साधारण किलोमागे वीस रुपये असते. त्यामानाने साठवणुकीच्या बर्फाची किंमत कमी असल्याने साहजिकच रस्त्यांवरच्या ठेल्यांपासून चकाचक आइस्क्रिम पार्लरमध्ये येणारा बर्फ हा अंबरनाथ, उल्हासनगर, मुंब्रा, तुर्भे, तळोजा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कारखान्यांमधून आलेला बर्फ वापरला जातो.खाण्याच्या व खाण्यायोग्य नसलेला अशा दोन प्रकारात बर्फाच्या कारखान्यांना परवानगी दिली जाते. खाण्याच्या बर्फासाठी स्वच्छ उपकरणे तसेच एकंदर स्वच्छता ठेवण्याची अट असते. मुंबईत खाण्याचा बर्फ तयार करण्यासाठी केंद्र सरकारचा परवाना असलेला एकमेव कारखाना आहे.

गर्भवती, लहान मुलांना धोका
इ कोलाय म्हणजे एस्केरीशिया कोलाय हा नळीच्या आकाराचा जीवाणू आहे. इ कोलाय हा जीवाणू बहुतांशवेळा मानव किंवा प्राण्यांच्या आतडय़ांमध्ये आढळतो. मात्र त्यातील काही प्रकारच्या इ कोलायमुळे (०१५७ – एच७) संसर्ग होऊ शकतो. असे इ कोलाय दूषित अन्न व पाण्यातून शरीरात गेले की अन्नावरची वासना उडणे, अंग मोडून येणे, ताप अशी लक्षणे दिसतात. जुलाब, आतडय़ांमध्ये पेटके येणे, शौचातून रक्त जाणे किंवा अगदी मूत्रपिंड विकार होण्यापर्यंत त्रास होऊ शकतो. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती, आजारी रुग्ण, गर्भवती स्त्रिया, लहान मुले तसेच वृद्धांमध्ये संसर्गाचा व आजार गुंतागुंतीचा होण्याची शक्यता वाढते. स्वच्छता आणि ताजे व शिजवलेले अन्न खाल्ल्याने संसर्गाची शक्यता बरीचशी कमी होते.