‘एलएचबी’ डब्यांची रेल्वेगाडी डिसेंबरमध्ये

मुंबई : मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ‘एलएचबी’नव्या रुपात आणतानाच यामध्ये खानपान व्यवस्थेच्या ऐतिहासिक डायनिंग कारला नवीन साज मिळणार आहे. सध्या बिगर वातानुकूलित असलेली डायनिंग कार नव्या रुपात येताना वातानुकूलित असेल. तर आतील अंतर्गत सजावटीवरही भर देण्यात आल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. डिसेंबर महिन्यात डेक्कन क्वीन प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

मुंबई ते पुणे मार्गावर डेक्कन क्वीन १ जून १९३० साली सुरू करण्यात आली. तेव्हापासून या गाडीला डायनिंग कार आहे. स्वतंत्र डायनिंग कार असलेली पहिली गाडी म्हणून डेक्कन क्वीनचा गौरवही केला जातो. या कारमध्ये आरामात बसून कटलेट, आमलेटसह सर्वच खाद्यपदार्थाचा आस्वादही घेता येतो. मात्र रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्वच गाडय़ा या एलएचबी कोच प्रकारातील करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एखादा अपघात झाल्यास जिवीतहानी कमी होते, तसेच गाडीचा वेगही वाढण्यास मदत मिळते. साधे डबे एलएचबी प्रकारात रुपांतर करताना त्यातील अंतर्गत सजावटीवरही भर दिला जातो. मात्र नवीन रुपात येणाऱ्या डेक्कन क्वीनमध्ये हा बदल करताना डायनिंग कार काढून टाकण्यात येणार होता. त्याला विरोध झाल्यानंतर मात्र रेल्वे मंत्रालयाने तो काढणार नसल्याचे स्पष्ट केले.

यासंदर्भात रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, डेक्कन क्वीन ही १७ डब्यांची असून ते साधे डबे आहेत. आता चेन्नईतील रेल्वे कारखान्यात नवीन डेक्कन क्वीनची बांधणी केली जात असून त्याचे डबे एलएचबी प्रकारातील आहेत. त्याच्या आसनक्षमतेत कोणताही बदल होणार नसून डायनिंग कारही काढली जाणार नाही. नवीन डायनिंग कार डेक्कनला जोडताना त्याची ऐतिहासिक जपणूक केली जाईल.

सध्याच्या डेक्कन क्वीनला असलेली डायनिंग कार ही वातानुकूलित नाही. मात्र येणारी डायनिंग कार वातानुकूलित असेल. तसेच त्याच्या खिडक्या मोठय़ा स्वरुपात काचेच्या असतील. या कारमध्ये मोकळी जागा बरीच निर्माण करण्यात येणार असून बसण्याची व्यवस्थाही उत्तम असणार आहे. तर अंतर्गत सजावटीवरीह भर देण्यात आल्याचे सांगितले.

एलएचबी डबे म्हणजे काय?

एलएचबी म्हणजे लिंके हॉफमन बुश. हे डबे हलके असतात. सध्या देशभरातील रेल्वे गाडय़ांना साधे डबे आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिने उपाय म्हणून एखादा अपघात झाल्यास जिवित आणि वित्तहानी कमी प्रमाणात होईल. तसेच वेगही वाढण्यास मदत मिळेल या उद्देशाने एलएचबी डबे असलेल्या गाडय़ा आणल्या जात आहेत.