काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई) या मंडळाचा दहावीचा (आयसीएसई) आणि बारावीचा (आयएससी) निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून यंदाही मंडळाचा निकाल घसघशीत जाहीर झाला. राज्यात दहावीचा निकाल ९९.९२ टक्के, तर बारावीचा निकाल ९८.५३ टक्के लागला आहे. यंदाच्या करोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गुणवत्ता यादी जाहीर न करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा अनेक विषयांच्या लेखी परीक्षा रद्द करण्याची वेळ मंडळावर आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल परीक्षा झालेल्या विषयांच्या गुणांची सरासरीनुसार जाहीर करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि उत्तीर्णतेची टक्केवारी थोडी वाढली आहे. यंदा देशपातळीवर दहावीचा निकाल ९९.३४ टक्के आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण ९८.५४ टक्के होते. यंदा बारावीचा निकाल ९६.८४ टक्के जाहीर झाला आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ९६.५२ टक्के होते. राज्यात दहावीचा निकाल ९९.९२ टक्के आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ९९.८५ टक्के होते. राज्यातील बारावीचा निकाल यंदा किंचितसा कमी झाला असून टक्केवारी ९८.५३ आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ९९.२७ टक्के होते. राज्यात परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या नाममात्र आहे. दहावीच्या परीक्षेत १७ तर बारावीच्या परीक्षेत ४६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

यंदा दहावीची एकूण ६१ लेखी विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी २२ भारतीय तर नऊ परदेशी भाषा होत्या. बारावीची एकूण १५ भारतीय आणि सहा परदेशी भाषांसह ५१ लेखी विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. निकालाबाबत शंका असलेल्या विद्यार्थ्यांना १६ जुलैपर्यंत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार असून त्यासाठी प्रत्येक विषयासाठी हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

दहावीचा निकाल

*   शाळा – २ हजार ३४१

*   देशात आणि परदेशात परीक्षेला बसलेले विद्यार्थी – २ लाख ७ हजार ९०२

*   उत्तीर्ण झालेले विद्यार्थी – २ लाख ६ हजार ५२५

*    राज्यातील शाळा – २२६

*    परीक्षेला बसलेले विद्यार्थी – २३ हजार ३३६

*    उत्तीर्ण झालेले विद्यार्थी – २३ हजार ३१९

बारावीचा निकाल

*    शाळा – १ हजार १२५

*    देशात आणि परदेशात परीक्षेला बसलेले विद्यार्थी – ८८ हजार ४०९

*    उत्तीर्ण झालेले विद्यार्थी – ८५ हजार ६११

*    राज्यातील शाळा – ५१

*    परीक्षेला बसलेले विद्यार्थी – ३ हजार १५०

*    उत्तीर्ण झालेले विद्यार्थी – ३ हजार १०४