माटुंगा येथील इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी)मध्ये शिकविल्या जाणाऱ्या रसायनशास्त्रातील एमएस्सी पदवीला ब्रिटनच्या ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’ची मान्यता मिळाली आहे. अशी मान्यता मिळवणारी ही देशातील दुसरी शैक्षणिक संस्था ठरली आहे. यापूर्वी पुण्यातील ‘आयसर’ संस्थेच्या अभ्यासक्रमाला ही मान्यता मिळाली आहे.
पूर्वीच्या विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाने शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करत अभिमत विद्यापीठापर्यंत आपली वाटचाल केली आहे. या संस्थेत चार वर्षांपूर्वी रसायनशास्त्रातील विविध सिद्धान्त याचबरोबर रसायन अभियांत्रिकी असा रसायनशास्त्राशी संबंधित विविधांगी एमएस्सी अभ्यासक्रमाची सुरुवात केली होती. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना निकाल लागण्यापूर्वीच नोकरी मिळे. याचबरोबर या अभ्यासक्रमाचा दर्जा आणि यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करून रॉयल सोसायटीची मान्यता मिळाल्याचे संस्थेचे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव यांनी सांगितले. या मान्यतेमुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांची दारे खुली होतील असेही ते म्हणाले.