रक्तदान करण्यासाठी जाताना यापुढे ओळखपत्र न्यायला विसरू नका. संशयित एचआयव्हीबाधित रक्तदात्यांशी संपर्क साधणे सोईचे व्हावे यासाठी आता रक्तदात्याच्या ओळखपत्रासह संपर्कासाठी आवश्यक माहितीची नोंद करण्याचे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून राज्यभरातील रक्तपेढय़ांना दिलेले आहेत.

विविध कार्यक्रम किंवा उपक्रमांमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांमध्ये मोठय़ा प्रमाणात दात्यांकडून रक्ताचे संकलन केले जाते. रक्तपेढय़ांमध्ये या रक्ताच्या एचआयव्ही, काविळ(हिपेटाईटिस) इत्यादी चाचण्या केल्या जातात. यात संशयित आढळेल्या रुग्णांना शासकीय एकात्मिक तपासणी आणि समुपदेशन केंद्रामध्ये पाठविले जाऊन पुढील चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु प्रत्यक्षात संशयित एचआयव्हीबाधितांपैकी काही टक्केच रुग्ण पुढील तपासण्यांसाठी केंद्रामध्ये येतात. गेल्या काही वर्षांपासून हे निदर्शनास येत असल्याचे मुंबई आणि महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटीने नमूद केले आहे. या रुग्णांचा पाठपुरावा करून केंद्रामध्ये तपासण्या करून घेण्याची जबाबदारी रक्तपेढय़ांनी घ्यावी, असेही अनेकदा परिषदेकडून सांगण्यात आले आहे.

रक्तदान करताना दात्यांची संपूर्ण माहिती घेतली जातेच असे नाही. त्यामुळे दात्यांची माहिती अनेकदा उपलब्ध नसते. काही वेळेस तर दात्यांनी नोंदविलेला संपर्क क्रमांक किंवा पत्ता अन्य माहिती खोटी असते. अशा वेळेस त्या व्यक्तीशी संपर्क साधणे शक्य नसल्याची तक्रार रक्तपेढय़ांनी केली आहे. या अडचणीवर राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या ४१ व्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. तेव्हा रक्तदात्यांची ओळखपत्रासह पत्ता, संपर्क क्रमांक ही माहिती नोंद करण्याचा मार्ग काढण्यात आला आहे.

एचआयव्हीचे वेळेत निदान झाले आणि तातडीने एआरटी उपचार पद्धती सुरू केल्यास आजाराच्या प्रसारावर नियंत्रण आणणे शक्य असते. परंतु या आजाराबाबत अजूनही समाजामध्ये असलेल्या अढीमुळे स्वत:हून एचआयव्हीची तपासणी करण्यासाठी लोक पुढे येत नाहीत. रक्तदान शिबिरांमध्ये दान केलेल्या रक्ताच्या चाचण्यानंतर आढळलेल्या संशयित एचआयव्हीबाधित दात्यांपर्यत पोहचण्यासाठी दात्यांची संपूर्ण माहिती नोंद करणे आवश्यक आहे असे नमूद करत याची अंमजलबाजवणी करण्याचे आदेश परिपत्रकाच्या माध्यमातून परिषदेने रक्तपेढय़ांना दिले आहेत.