खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या, प्रकृती स्थिर असलेल्या ‘करोना’ रुग्णांना यापुढे रुग्णालयातून पंचतारांकित हॉटेलात हलवण्याचा विचार आहे. त्याकरिता खासगी रुग्णालये पंचतारांकित हॉटेलांशी संलग्न करण्यात येणार आहेत. गंभीर स्थितीतून बाहेर आलेल्या रुग्णांना पुढील देखरेखीसाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवल्यानंतर संबंधित रुग्णालयात दुसऱ्या रुग्णांना खाटा व उपचार उपलब्ध होऊ शकतील, असा पालिके चा विचार आहे. पालिके ने या सोयीकरिता दर ठरवून दिले असून सध्या दोन पंचतारांकित हॉटेलांनी यासाठी तयारी दर्शवली आहे.

पालिके ने करोना रुग्णांसाठीच्या खाटांची संख्या वाढवलेली असली तरी खासगी रुग्णालयातही खाटांची मागणी वाढली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयातील खाटांचे व्यवस्थापन बिघडले आहे. रुग्णांना खासगी रुग्णालयात खाटा मिळणे मुश्कील झाले आहे. त्यातच अनेकदा करोनाच्या गंभीर स्थितीतून बाहेर आलेले रुग्णही पुढचे काही दिवस रुग्णालयातच दाखल असतात. अशा रुग्णांना बऱ्याचदा प्राणवायू, कृत्रिम श्वसन उपकरणे यांची गरज नसते, तर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली आराम करण्याची गरज असते. परंतु या रुग्णांनी खाटा व्यापलेल्या असल्यामुळे गंभीर रुग्णांना खाटा उपलब्ध होत नाहीत, असे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

‘स्टेप डाऊन’ संकल्पना

खासगी रुग्णालये आणि हॉटेल यांना संलग्न करण्याच्या संकल्पनेला पालिके ने ‘स्टेप डाऊन’ असे नाव दिले आहे. पालिके च्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्ण जसे नंतर सामान्य विभागात आणले जातात, तशीच ही प्रक्रिया असणार आहे. मात्र यात हॉटेलमध्ये संबंधित रुग्णालयामार्फत वैद्यकीय सेवा पुरवली जाणार आहे.

याबाबत पालिके ने नियमावलीही तयार के ली आहे. पालिका आणि खासगी रुग्णालयांनी अशा इच्छुक हॉटेलांचा शोध घ्यावा. रुग्णालय आणि हॉटेल यांनी आपापल्या भूमिका, जबाबदाऱ्या स्पष्ट करून घ्याव्यात. अशा हॉटेलमध्ये किमान २० खोल्यांची व्यवस्था असावी. म्हणजे ही हॉटेल त्या संबंधित रुग्णालयाचाच विस्तारित भाग असल्याप्रमाणे काम करतील. खासगी रुग्णालयांनी आपल्याकडील रुग्णांच्या प्रकृतीचा दररोज पाठपुरावा करावा. ज्यांना प्राणवायू, अतिदक्षता विभाग, कृत्रिम श्वसन यांची गरज नाही अशा रुग्णांना संलग्न हॉटेलमध्ये हलवावे, मात्र त्याकरिता डॉक्टरांनी प्रमाणपत्र देणे आवश्यक असेल. संबंधित रुग्णालयांनी त्या हॉटेलमध्ये अन्य वैद्यकीय सेवा पुरवाव्यात, चोवीस तास डॉक्टर, परिचारिका, औषधे, जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट आणि रुग्णवाहिका रुग्णालयांनी पुरवावी, हॉटेलांनी सर्व सुविधा व जेवण पुरवावे. रुग्णांना किती काळ या ठिकाणी ठेवायचे याचा निर्णय डॉक्टरांनी घ्यावा, अशी ही संकल्पना आहे.

चार हजार रुपये दर

हॉटेलांनी प्रति रुग्ण, प्रति दिवस चार हजार रुपये दर आकारावा, असे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत. यात जेवण आणि सर्व करांचा समावेश असेल. ही रक्कम रुग्णालयांनी हॉटेलांना द्यावी. तसेच रुग्णालयांनी त्याव्यतिरिक्त आपले वैद्यकीय सेवेचे दर आकारावेत. एकाच घरातील दोन रुग्ण असतील तर त्यांना एकाच खोलीत ठेवण्याची व्यवस्था करता येईल. त्याकरिता एका खोलीमागे ६,००० रुपये भाडे आकारावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

दोन हॉटेल तयार

सध्या तरी दोन हॉटेलनी यासाठी तयारी दर्शवली असून मुंबई रुग्णालयाशी मरिन ड्राइव्ह येथील ‘इंटरकॉन्टिनेण्टल’ हे हॉटेल संलग्न आहे. तर एच. एन. रिलायन्स या रुग्णालयाशी बीके सी येथील ‘ट्रायडण्ट’ हॉटेल संलग्न करण्यात आले आहे.