दादरच्या ‘इंडियन एज्युकेशन सोसायटी’ संचलित ‘पद्माकर ढमढेरे प्राथमिक शाळे’तील (इंग्रजी माध्यम) मनमानी शुल्कवाढीच्या चौकशीचे आदेश पालिका उपशिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच, गेल्या तीन वर्षांतील शाळेचे लेखा अहवाल उपशिक्षणाधिकाऱ्यांनी मागविले असून चौकशी होईपर्यंत एकाही विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊ नये, असे शाळा व्यवस्थापनाला बजावले आहे.

गेली दोन वर्षे या शाळेत पहिली-दुसरी इयत्तेच्या शुल्कवाढीवरून पालक आणि संस्थाचालकांमध्ये वाद आहे. गेल्या वर्षी पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्करचनेवरून हा वाद सुरू झाला. शाळेत २०१५पर्यंत इयत्ता पहिलीकरिता २१ हजार रुपये इतके शुल्क आकारले जात होते. परंतु, २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क एकदम ४१ हजार रुपये इतके वाढविण्यात आले. पालकांनी शिक्षण उपसंचालक आणि पालिका शिक्षण समितीच्या अध्यक्ष हेमांगी वरळीकर यांच्याकडे तक्रार केली होती.

शुल्कवाढीच्या प्रश्नावरून पालिका उपशिक्षणाधिकारी मुख्यालयात झालेल्या बैठकीला शाळेचे मुख्याध्यापक, संस्थाचालक, पालक आणि युवा सेनेचे प्रदीप सावंत उपस्थित होते. या बैठकीत शुल्कवाढीला स्थगिती देण्यात आली.