आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाची युती होऊन दोनच दिवस झाले आहेत. पण दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्याकडून आता मुख्यमंत्रिपदावरून युती तोडण्याची भाषा सुरू झाली आहे. राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या अटीवरच युती झाली असून भाजपाने तसे न केल्यास शिवसेना युती तोडेल, असा दावा शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला आहे. रामदास कदम यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

युतीमध्ये नैतिकता असावी. नैतिकता नसेल तर युती तोडा. विधानसभा निवडणुकीत ज्यांच्या जास्त जागा येतील, त्यांचा मुख्यमंत्री येईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. पण हे चुकीचे आहे. चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा करावी. नाहीतर झालेली युती उलटसुलट बोलण्यामुळे पुन्हा तुटायची, असे कदम म्हणाले.

चाव्या चोरांच्या हाती जाऊ नये म्हणून आम्ही युती केली आहे, अशा शब्दांत काँग्रेस- राष्ट्रवादीवर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. मुख्यमंत्रिपद दोघांकडेही राहणार आहे. समान सत्तेचे राजकारण झाले नाही तर पाडापाडीचे राजकारण होते, असा इशारा त्यांनी दिला.